धर्माला चिकटून बसणारे आणि महिलांवर निर्बंध घालणारे अनेक धर्मगुरु तुम्ही पाहिले असतील. धर्मगुरुंच्या प्रतिगामी विचारांमुळे अनेकदा त्यांना लोकांच्या रोषालादेखील सामोरे जावे लागते. मात्र ऑस्ट्रेलियातील एका इमामाला चक्क त्याच्या पुरोगामी विचारांमुळे मार खावा लागला आहे. विशेष म्हणजे एका वाहिनीच्या थेट प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमात या इमामावर बुटांचा मार खाण्याची वेळ आली.
सिडनीतील एका वाहिनीच्या कार्यक्रमात वादग्रस्त इमाम मुस्तफा राशिद सहभागी झाले होते. मुस्तफा राशिद यांच्यासमोर पेशाने वकील असलेले नाहिब अल वाशाह बसले होते. मुस्तफा आणि नाहिब यांच्यात वाद झाला. त्यामुळे मुस्लिम महिलांनी बुरखा आणि हिजाब घालावा की घालू नये, या विषयावर सुरू असलेली चर्चा हमरीतुमरीवर गेली. मुस्लिम महिलांना बुरखा किंवा हिजाब घालण्याची गरज नाही. शिवाय त्यांनी मद्यपान करण्यासही मनाई नाही, या शब्दांमध्ये मुस्तफा यांनी त्यांची बाजू मांडली.
मुस्तफा यांच्या या मतांमुळे नाहिब चांगलेच खवळले. वाद सुरू असताना मुस्तफा अचानक उठले आणि नाहिब यांच्याशी भांडू लागले. यानंतर नाहिब यांनी त्यांच्या पायातील बूट काढून मुस्तफा यांच्या दिशेने सरसावले आणि त्यांनी तो बूट मुस्तफा यांना फेकून मारला. यावेळी स्टुडिओत उपस्थित असलेल्या कार्यक्रमाच्या सूत्रधाराने नाहिब आणि मुस्तफा यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा कोणताही उपयोग झाला नाही.
मुस्तफा आधी इजिप्तमध्ये राहायचे. मुस्तफा यांचे विचार इस्लाम धर्माच्या इतर मौलवी आणि धर्मगुरुंपेक्षा खूप वेगळे आहेत. मुस्तफा यांचे ‘नवे विचार’ पटत नसल्याने ते नेहमीच इतर मौलवी आणि धर्मगुरुंच्या निशाण्यावर असतात. कुराणने कोणत्याही महिलेला हिजाब किंवा बुरखा घालण्याची सक्ती केलेली नाही, असा फतवा २०१४ मध्ये मुस्तफा यांनी काढला होता. शिवाय महिलांनी मद्यपान करण्यास कुराणने कोणतीही आडकाठी केलेली नाही, असेही मुस्तफा यांनी म्हटले होते.