जगण्याची तीव्र इच्छा कोणत्याही संकटावर मात करू शकते, हेच ऑस्ट्रेलियातील २१ वर्षीय तरुणानं दाखवून दिलंय. मृत्यूशी केलेला संघर्ष त्याने स्वतःच कथन केलाय. व्यवसायानं टेक्निशिअन असलेला थॉमस एके दिवशी आपल्या कारनं घरी जायला निघाला. तो युलरा इथं पोहोचल्यावर त्याच्या कारला अपघात झाला. समोरून उंटाचा तांडा येत होता. त्यांना वाचवण्यासाठी त्यानं आपली कार बाजूला घेण्याचा प्रयत्न केला. हे करताना त्याचं कारवरचं नियंत्रण सुटलं आणि अपघात झाला. यातून तो थोडक्यात बचावला. पण त्याचा घरी परतण्याचा मार्ग बंद झाला.

दुर्गम भागात अडकल्यानंतर त्याच्या परतीचे सर्व मार्ग बंद झाले. कोणतीही मदत मिळण्याची अपेक्षा नव्हती. घरी परतायचं असल्यानं थॉमसकडे एक टॉर्च आणि काही कपड्यांव्यतिरिक्त काहीच नव्हतं. जर आपण इथंच राहिलो तर घरी कधीही परतू शकत नाही हे थॉमसला चांगलंच ठाऊक होतं. तेव्हा चालतच घरी जाण्याचा निर्णय त्यानं घेतला. दोन दिवस चालत त्यानं जवळपास १५० किलोमीटर अंतर पार केलं. डोक्यावर रणरणतं ऊन, पोटात अन्नाचा एक कणही नव्हता.पिण्यासाठी पाणी नव्हतं. पण जगण्याची इच्छा तीव्र होती. पिण्याचं पाणी नसल्यानं थॉमसनं दोन दिवस आपलं मूत्र प्राशन केलं. काहीही झालं तरी संकटाशी सामना करण्याचा निर्धार त्यानं केला. दुसरीकडे थॉमस घरी पोहोचला नाही हे त्याच्या कुटुंबीयांच्या लक्षात आलं. त्यांनी शोधाशोध करायला सुरूवात केली. तब्बल ६० तासांनंतर तो सापडला.

‘जर पोलिसांनी माझा शोध घेतला नसता तर कदाचित मी जिवंत राहिलो नसतो. यातून मी वाचलो हे माझे सुदैव आहे, असं त्यानं ‘पीटीआय’ला सांगितलं. त्याचा ६० तासांचा जगण्याचा संघर्ष अंगावर शहारे आणणारा तर आहेच; पण संकटाच्या काळात खचून न जाता त्यातून मार्ग कसा काढावा, याचं उत्तम उदाहरण म्हणावं लागेल.

Story img Loader