चित्र काढणे किंवा एखादी कला सादर करणे हे सामान्यपणे माणसाचे काम असते. पण काही वेळा या कला प्राण्यांमध्येही पाहायला मिळतात. त्यांच्यातील या कला आपल्याला अक्षरश: थक्क करुन टाकतात. व्हीएन्नामध्ये असलेल्या एका प्राणीसंग्राहालयातील पांडा अतिशय सुंदर चित्रे काढण्यासाठी प्रसिद्ध झाला आहे. हा पांडा काढत असलेली चित्रे इतकी आकर्षक आहेत की ती प्राणीसंग्रहालयाकडून विक्रीसाठीही ठेवण्यात येतात. आता पांडाने काढलेल्या चित्रांना किती किंमत मिळणार असे कदाचित तुम्हाला वाटू शकेल. ऑस्ट्रीयामधील यांग यांग नावाच्या या मादी पांडाने काढलेल्या चित्राला तब्बल ४० हजारांहून अधिक किंमत मिळाली आहे.
या पांडाने कॅनव्हारवर एकाच रंगात बांबूच्या ब्रशने ही चित्रे रेखाटली आहेत. या मादी पांडाला ५ पिल्ले असून त्याने काढलेली चित्रे आणि त्यांचे व्हिडियो सोशल मीडियावरही व्हायरल झाले आहेत. तिने आतापर्यंत काढलेल्या एकूण चित्रांपैकी उत्कृष्ट अशा १०० चित्रांची विक्री होणार असून त्यातून मिळणारा निधी पांडाच्या लुप्त होत असलेल्या प्रजातींची माहिती देणारे फोटोबुक तयार करण्यासाठी वापरला जाणार आहे. आता हा निधी जमा झाल्यास हे पुस्तक ख्रिसमसच्या दरम्यान प्रकाशित केले जाणार आहे. हे पुस्तक जर्मन आणि इंग्रजी अशा दोन भाषांमध्ये प्रकाशित करण्यात येणार आहे.
या पुस्तकासाठी आवश्यक असणाऱ्या निधीच्या जवळपास सर्व निधी अवघ्या तीन दिवसांत जमा झाल्याचे या प्राणीसंग्रहालयाकडून सांगण्यात आले आहे. हा पांडा हातात ब्रश धरुन एखाद्या चित्रकाराप्रमाणे चित्र काढताना व्हिडियोमध्ये दिसत आहे. प्राणीसंग्रहालयातील कर्मचारी या पांडांच्या समोर कॅनव्हास धरतात. मग ते अतिशय रसिकपणे त्यावर चित्र काढताना दिसत आहेत. एकीकडे त्यांना खायलाही घातले जात आहे.