‘इन्फोसिस फाउंडेशन’च्या प्रमुख आणि आपल्या समाजकार्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या सुधा मूर्ती यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. या फोटोवरुन सोशल मीडियावर वाद निर्माण झाला असून दोन गट पडल्याचं चित्र दिसत आहे. तसा हा फोटो जुनाच आहे. मात्र या फोटोमध्ये सुधा मूर्ती एका महिलेच्या पाया पडताना दिसत आहे. सुधा मूर्ती ज्या महिलेच्या पायाजवळ वाकल्या आहेत त्यांचं नाव आहे प्रमोदा देवी वाडियार! मैसूरच्या राजघराण्यातील त्या सदस्या आहेत. या फोटोमध्ये अभिनेत्री बी. सरोजा देवीही दिसत आहेत. हा फोटो २०१९ मध्ये काढण्यात आला आहे. मैसूर राजघराण्यातील शेवटचे राजे जयाचमाराजा वाडिया यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमासाठी सुधा मूर्ती यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. त्याचवेळी काढण्यात आलेला हा फोटो आहे. प्रमोदा देवी वाडियार या श्रीकांतदत्त नृहसिंहराजा वाडियार यांच्या पत्नी आहेत.
सोशल मीडियावर सुधा मूर्ती यांचा हा फोटो व्हायरल झाला असून अनेकांनी या प्रथेवर टीका केली आहे. सुधा मूर्तींसारख्या प्रतिष्ठित व्यक्तीला या वयामध्ये आणि आजच्या युगात अशाप्रकारे समोरची व्यक्ती केवळ राजघराण्यातील आहे म्हणून वाकून नमस्कार करायला लागणं हे दुर्दैवाचं असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे. तर काहींनी सुधा मूर्ती यांनी राजघराण्याबद्दल असणारा आदर व्यक्त करण्यासाठी केलेली ही एक कृती असून त्यामधून त्यांच्या मनात या घराण्याबद्दल असणारा सन्मान दिसत असल्याचं म्हटलं आहे.
सोशल मीडियावर हा फोटो शेअर करत एका युजरने, “सुधा मूर्ती या मैसूर राजघराण्याच्या सदस्याला नमस्कार करत आहेत. खरं तर त्या अनेकांसाठी आदर्श व्यक्तीमत्व आहेत. आजही भारतामध्ये राजघराण्यामधील लोकांना अशापद्धतीने अभिवादन करण्याची पद्धत आहे? की हे फक्त मान-सन्मान देण्याच्या दृष्टीने केलेली कृती आहे?” असा प्रश्न विचारला आहे.
अन्य एकाने, “हे पाहा सुधा मूर्ती मैसूरच्या राजघराण्यातील व्यक्तींना नमस्कार करत आहेत. त्यांनी एक रोल मॉडेलमध्ये म्हणून वावरलं पाहिजे,” असं म्हटलं आहे.
“अरे देवा काय हे? या सुधा मूर्ती आहेत का? त्या राजघराण्यातील व्यक्तीसमोर नतमस्तक झाल्या आहेत का? ही विचारसरणी आपल्या रक्तात आहे. कितीही पैसा कमवला किंवा यशस्वी झालं तरी हे आपल्या वागण्यामधून कोणीच काढून घेऊ शकत नाही,” असं अन्य एकाने म्हटलं आहे.
एका व्यक्तीने, “मला सुधा मूर्तीबद्दल फार आदार आहे. त्यांच्या अनेक पुस्तकांनी महिलांना प्रेरणा दिली आहे. त्यांनी राजघरण्यातील व्यक्तीसमोर केलेली ही कृती भावनिक असून त्या स्वत: मैसूरच्या राजघराण्यापेक्षा अधिक रॉयल आहेत,” असं म्हणत मूर्ती यांची पाठराखण केली आहे.
दोन्ही बाजूंनी युक्तीवाद करणाऱ्या अनेक प्रतिक्रिया या फोटोवर आहेत. काहींना हे अयोग्य वाटलं आहे तर काहींनी यामध्ये काहीच गैर नसल्याचं म्हटलं आहे. सुधा मूर्ती यांनी इन्फोसिसचे संस्थापक असलेले त्यांचे पती नारायण मूर्तींच्या मदतीने १९९६ साली ‘इन्फोसिस फाउंडेशन’ची स्थापना केली. ही संस्था समाजिक क्षेत्रात काम करते. आरोग्य, शिक्षण आणि मागलेल्या घटकांसाठी या संस्थेनं मागील २६ वर्षांमध्ये बरंच काम केलं आहे.