Avatar: The Way Of Water- जेम्स कॅमरून यांच्या ‘अवतार : द वे ऑफ वॉटर’ या चित्रपटाची सध्या सगळीकडेच चर्चा आहे. २००९ साली आलेल्या ‘अवतार’ने सर्वाधिक कमाईचा इतिहास रचला होता. तब्बल १२ वर्षांनी या चित्रपटाचा दुसरा भाग आला आहे. अवतार चित्रपटाची क्रेझ केवळ सिनेमाघरांमध्येच नव्हे तर अगदी गावागावात दिसून येत आहे. नुकतंच सेलियामेडू शासकीय उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी अवतार मधील नेतिरी, जेक सुली आणि ग्रेट लिओनोप्टेरिक्स या मुख्य पात्रांच्या मूर्ती तयार करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. टाकाऊ पासून टिकाऊ अशा पद्धतीने तयार केलेल्या या मूर्ती इतक्या परफेक्शनने बनवल्या आहेत की त्या पाहून चाहतेही थक्क झाले आहेत.

संतोष आणि नवनीथाकृष्णन असे या मूर्तिकारांचे नाव आहे. नारळाच्या करवंट्या, काथ्या, मंदाराची पाने आणि ताडाची पाने यांसारख्या नैसर्गिक टाकाऊ पदार्थांचा वापर करून या अवतार सिनेमातील पात्रांच्या मूर्ती तयार करण्यात आल्या आहेत. या कलाकुसरीला आकार देण्यासाठी या विद्यार्थ्यांना केवळ एकच आठवडा लागला होता. याआधीही विद्यार्थ्यांनी तामिळसाईचे शिल्प साकारले होते.

Avatar चा भन्नाट अवतार

असा बनला आहे Avatar चा लुक (फोटो: ANI)
असा बनला आहे Avatar चा लुक (फोटो: ANI)

‘अवतार: द वे ऑफ वॉटर’ १६ डिसेंबर रोजी इंग्रजी, हिंदी, तमिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित झाला. तरण आदर्श यांच्या माहितीनुसार , ४०० मिलियन डॉलर बजेट असलेल्या या चित्रपटाने संपूर्ण भारतात चार दिवसात ४१ कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी हा चित्रपट काही साईट्सवर लीक झाला होता.