Ayodhya Celebration Of BJP Defeat: ज्या अयोध्येतील राम मंदिराला भाजपाच्या निवडणूक प्रचारात सर्वाधिक महत्त्व होतं त्याच अयोध्येत यंदाच्या निवडणुकीत भाजपाच्या उमेदवाराचा सपशेल पराभव झाला. फैजाबादमध्ये समाजवादी पक्षाचे उमेदवार अवधेश प्रसाद यांना भाजपाच्या लल्लू सिंह यांच्यापेक्षा तब्बल ५४ हजाराहून अधिक मते देत अयोध्यावासियांनी विजयी करून दिले. या अनपेक्षित निकालानंतर आता पहिल्यांदाच अयोध्येतील सेलिब्रेशनचा व्हिडीओ असे म्हणत काही क्लिप्स व्हायरल होत आहेत. लाइटहाऊस जर्नलिझमला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर होत असलेले काही व्हिडीओ आढळून आले ज्यात, रात्रीच्या आकाशात फटाक्यांची आतिषबाजी होताना दिसत आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अयोध्या आणि बाराबंकी येथील लोक आनंदोत्सव साजरा करत असल्याचा दावा पोस्टमध्ये करण्यात आला आहे. यासंदर्भात आमचा तपास काय सांगतो, पाहूया..
काय होत आहे व्हायरल?
X यूजर Firdaus Fiza ने व्हिडीओ आपल्या प्रोफाइल वर शेअर केला.
इतर वापरकर्ते देखील त्याच दाव्यासह समान व्हिडीओ शेअर करत आहेत.
तपास:
तपासादरम्यान आम्हाला आढळले की अनेक वापरकर्त्यांनी पोस्टवर दावा खोटा असल्याचे लिहिले आहे. दुसऱ्या युजरने लिहिले की, व्हिडीओ जयपूरचा आहे.
आम्ही हा व्हिडीओ शेअर करणाऱ्या इतर सोशल मीडिया वापरकर्त्यांचा शोध घेत असताना, आम्हाला आढळले की काही वापरकर्त्यांनी कमल शर्माने पोस्ट केलेला व्हिडिओ शेअर केला आहे. त्यानंतर आम्ही त्याची पोस्ट तपासली.
कमल शर्मा यांनी १५ जानेवारी २०२३ रोजी पोस्ट शेअर केली होती, त्यात उल्लेख केला होता की हा व्हिडीओ जयपूरमध्ये मकर संक्रांतीच्या पतंगोत्सवादरम्यान केलेल्या आतिषबाजीचा आहे. आम्हाला असेच काही व्हिडीओ सापडले ज्यांच्या कॅप्शनमध्ये २०२३ मध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी आतिषबाजीने आकाश उजळून टाकल्याचे नमूद करण्यात आले होते.
हे ही वाचा<< मोदी मोदी नामगजरापासून नितीन गडकरी अलिप्त; सोशल मीडियावर कौतुक, व्हायरल व्हिडीओतील सत्य काय?
निष्कर्ष: २०२३ मधील मकर संक्रांतीच्या निमित्ताने जयपूरमधील फटाक्यांच्या आतषबाजीचा व्हिडिओ, अयोध्या आणि बाराबंकी येथे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आनंदोत्सव साजरा करणाऱ्या लोकांचा सांगून व्हायरल व्हिडीओ खोटा आहे.