Ayodhya Ram Mandir Opening Ceremony: आज २२ जानेवारी रोजी बहुप्रतीक्षित श्रीराम मंदिराचे उद्घाटन झाले असून, श्रीराम यांच्या मूर्तीची पहिली झलकसुद्धा रामभक्तांना पाहायला मिळाली आहे. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी अनेक रामभक्त अयोध्येत पोहोचले आहेत. ज्यांना अयोध्यात जाणे जमले नाही. त्यांनी श्रीराम मंदिर उद्घाटनाचा उत्सव साजरा करण्याचे विविध मार्ग शोधून काढले आहेत. हवन, भजन करण्यापासून ते रस्त्यांच्या कडेला श्रीरामाचे मोठी पोस्टर्स लावण्यापर्यंत अनेक जण विविध गोष्टी उत्साहाने करीत आहेत. विविध शहरांमध्ये कशा प्रकारे श्रीराम मंदिर उद्घाटन सोहळा साजरा करण्यात येत आहे. त्यावर एक नजर टाकू या.
१. दिल्ली
गजबजलेल्या दिल्ली शहरात रिक्षाचालकांपासून ते अरबपतीपर्यंत सर्व जण श्रीराम मंदिर उद्घाटनाचा हा उत्सव साजरा करीत आहेत. दिल्लीतील रस्ते आणि २,५०० राम मंदिरे आजच्या कार्यक्रमासाठी खास सजवण्यात आली आहेत. तसेच काही ठिकाणी भगव्या रंगाचे फुगे आणि पताक्यांची खास सजावट करण्यात आली आहे.
२. सुरत
सुरतमध्ये उत्साही वातावरण पाहायला मिळाले आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, सर्व रामभक्तांनी मिळून मिरवणूक काढली आहे. सर्व जण भक्तिभावाने झेंडे फडकवताना आणि स्पीकरवर गाणी लावून टाळ्या वाजवताना दिसून आले आहेत.
३. अहमदाबाद
अहमदाबादमध्ये एक छोटा मंडप बांधला गेला आहे. या मंडपात रामभक्तांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. श्रीराम यांचा फोटो आणि प्राणप्रतिष्ठा सोहळा लाइव्ह पाहण्यासाठी टीव्ही स्क्रीनसुद्धा लावण्यात आल्या आहेत. तसेच एका व्यक्तीने श्रीरामाची अद्भुत रांगोळी काढली आहे. एकूणच अहमदाबादच्या प्रत्येक सोसायटीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीत श्रीराम यांचे स्वागत केले जात आहे.
४. वाराणसी
आज सकाळी रामभक्तांनी वाराणसीतील गंगा नदीला भेट दिली आणि त्यात स्नान केले. गंगा नदीकाठी उभ्या असलेल्या रामभक्तांचे फोटो एएनआयने (ANI) शेअर केले आहेत.
५. नोएडा
नोएडातील काही इमारतींना विद्युत रोषणाईने सजवण्यात आले आहे. या इमारती लख्ख प्रकाशासह उजळलेल्या दिसत आहेत. इतकेच नाही, तर लोकांनी त्यांच्या बाल्कनीत येऊन ‘जय श्रीराम’ असा जयघोष करीत उत्साह आणि आनंद वाढवला आहे.
६. चेन्नई
चेन्नई येथील व्हीआयटी (VIT) वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांनी कॉरिडॉरमध्ये ‘जय श्रीराम’चा नारा दिला. या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी विद्यार्थी टाळ्या वाजवत, जय श्रीरामाचा जयघोष करीत या सोहळ्यासाठी उत्साह दाखवताना दिसले आहेत.
हे सर्व व्हिडीओ एक्स (ट्विटर) युजर्सच्या @Anivesh1867, @Ind_RAM_ , @withlovesayak, @akki_dhoni, @FOLLOWASHI या विविध अकाउंटवरून घेण्यात आले आहेत.अशा खास पद्धतीत विविध शहरांमध्ये श्रीराम मंदिर उद्घाटनाचा सोहळा उत्साहात साजरा करण्यात येत आहे.