Shri Ram Welcome in New York Times Square : अयोध्येतील राम मंदिरात पार पडणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त देशभर जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळतेय. भाविकांच्या जय श्रीरामाच्या घोषणांनी अयोध्येतील रस्ते दुमदुमून गेले आहेत. त्यानिमित्त परदेशात राहणाऱ्या रामभक्तांमध्येही प्रचंड उत्साह दिसून येत आहे. याची झलक अमेरिकेतील न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअरच्या चौकातही पाहायला मिळाली. येथील संपूर्ण परिसर रामनामाच्या जयघोषणांनी आणि ढोल-ताशांच्या गजराने दुमदुमून गेला होता.
अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअर चौकात रामभक्तांची मोठी गर्दी जमली. या उत्सवात शेकडो हिंदूंनी भाग घेतल्याने आयकॉनिक बिझनेस हब आज रामनामाच्या गजराने न्हाऊन गेला आहे. अनेक भारतीय तेथील रस्त्यांवर हातात श्रीरामाचे भगवे झेंडे हातात घेऊन आनंदाने नाचताना दिसते. टाइम्स स्क्वेअरसमोर जणू रामभक्तांचा मेळा जमल्याचे दृश्यांमध्ये दिसतेय. यावेळी भारतीय महिलांनी राम आयेंगे गाण्यावर नृत्याचा आनंद घेतला. तसेच तबल्याच्या साथीने रामाची गाणी, भजन-कीर्तन म्हणत लोक आध्यात्मिक रंगात रंगून गेले आहेत.
‘भारत का बच्चा बच्चा’ गाण्यावर ट्रेनमधील प्रवाशांनी घेतला नृत्याचा आनंद; पाहा VIDEO
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअर चौकात अनेक भारतीय रामनामाच्या भजनात दंग होऊन नाचत आहेत. अनेक जण पारंपरिक भारतीय पोशाख परिधान करून हातात भगवे झेंडे घेऊन रामाचा जयघोष करीत आहेत. या सोहळ्याचे मोठ्या एलईडी स्क्रीनवर थेट प्रक्षेपण केले जात आहे. शेकडो भारतीय आणि अमेरिकन भाविक भगवान श्रीरामाचे दर्शन घेऊन आणि मंत्रोच्चार करून सोहळ्याचा आनंद लुटत आहेत. टाइम्स स्क्वेअरच्या मोठ्या होर्डिंगवर भगवान राम, सीतामाता व लक्ष्मण यांचे फोटो झळकत आहेत. रंगीबेरंगी माळा आणि दिव्यांनी सजलेला चौक आध्यात्मिक उर्जेने भारलेला आहे.
नृत्य सादरीकरण, भजन-कीर्तन आणि तबल्यांच्या माध्यमातून रामकथेचे जिवंत चित्रण केले जात आहे. प्रभू रामाच्या जीवनातील महत्त्वाच्या घटना कलात्मक पद्धतीने मांडण्यात आल्याने प्रेक्षक मंत्रमुग्ध होत आहेत. लहान मुलांचे राम भजन गाणे, रामलीलांचे मंचन आणि महिलांनी काढलेल्या सुंदर रांगोळीमुळे उत्सवात भर पडत आहे.
रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा मुहूर्तातील ‘ही’ ८४ सेकंद आहेत सर्वात खास; जाणून घ्या शुभ मुहूर्ताची वेळ
टाइम्स स्क्वेअरमध्ये आयोजित करण्यात आलेला हा महोत्सव केवळ अयोध्येत होणाऱ्या उत्सवांचे प्रतिबिंब नाही, तर भारताचा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारसा जागतिक मंचावर मांडण्याचा एक महत्त्वाचा प्रयत्न आहे.