Ayodhya Ram Mandir : अयोद्धेत २२ जानेवारी रोजी राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. त्यामुळे राम मंदिरामध्ये जय्यत तयारी सुरू आहे. १०० हून अधिक वर्षे ज्या राम मंदिरासाठी वाद सुरू होता, तो आता संपुष्टात आला असून राम मंदिराच्या उद्घाटनाने एक नवी सुरुवात होत आहे. राम मंदिराच्या उद्घाटनासाठी अनेक राम भक्त उत्सूक आहेत.अनेक लोकांना हे भव्य राम मंदिर कसे असेल आणि मंदिराची रचना कशी असेल, याबाबत कायम उत्सूकता होती पण आता सोशल मीडियावर राम मंदिराचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहे.
राम मंदिराच्या बांधकामाविषयी नवनवीन माहिती समोर येत आहे. अशातच राम मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ गज, सिंह, हनुमान आणि गरुडाच्या मुर्तीची स्थापना करण्यात आली आहे. सोशल मीडियावर या मुर्तींचे फोटो सध्या व्हायरल होत आहे.
अयोध्येतील राम मंदिराबाहेर गज, सिंह, हनुमान आणि गरुडाच्या मुर्तीची स्थापना स्थापना करण्यात आली. फिक्या गुलाबी रंगाच्या या मुर्ती अतिशय आकर्षक दिसतात. राजस्थानच्या बंसीपहाडपूर गावातून हे दगड अयोद्धेत आणण्यात आले. या दगडाला बलुआ दगड म्हणतात. बलुआ दगडाच्या या मुर्तीनी राम मंदिराची शोभा वाढवली आहे.
राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टनी राम मंदिराच्या भव्य सिंह द्वारचे फोटो शेअर केले आहेत. त्यात या गज, सिंह, हनुमान आणि गरुडाच्या मुर्ती दिसून येत आहेत. सिंहद्वारापासून ३२ पायऱ्या चढून पूर्व दिशेकडून मंदिरात प्रवेश होईल. या मुर्तींचे वैशिष्ट्य म्हणजे या सर्व मुर्ती मंदिराच्या पायऱ्याजवळ विराजमान केले आहे. या कलाकृती बिहार, उत्तरप्रदेश आणि गुजरातच्या कारागिरांनी बनवल्या आहेत.
हेही वाचा : “रामाच्या नावावर जे आपली राजकीय पोळी भाजून घेत आहेत ते..”, धीरेंद्र शास्त्रींचं वक्तव्य चर्चेत
ShriRamTeerth या एक्स अकाउंटवरुन राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टनी या संदर्भात माहिती दिली. त्यांनी या पोस्टमधील शेअर केलेले गज, सिंह, हनुमान आणि गरुडाच्या मुर्तीचे भव्य फोटो पाहून अनेक लोकांनी या पोस्टवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एका युजरने लिहिलेय, “शानदार ,जबरदस्त, जिंदाबाद जय जय श्री राम” तर एका युजरने लिहिलेय, “सुंदर! मंदिराच्या नयनरम्य आणि अलौकिक सौंदर्यात योगदान देणारी ही शिल्पे पाहून भाविकांना आनंद होईल. जय श्री हनुमान! जय श्री राम!” अनेक युजर्सनी कमेंट्समध्ये “जय श्री राम” चा वर्षाव केला आहे.