Ayodhya Ram Mandir Inauguration : भारतातील अनेक श्रीराम भक्त २२ जानेवारीची वाट पाहत आहेत. प्रभू श्रीरामाच्या आगमनाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. अनेक जण आता या क्षणाचे साक्षीदार होण्याच्या तयारीत आहेत. त्यासाठी देशातील कानाकोपऱ्यांत जय्यत तयारी सुरू आहे. अनेक लोक प्रभू श्रीरामावरील प्रेम, भक्ती दाखवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्यात आता तेलंगणातील हैदराबादमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने प्रभू श्रीराम चक्क १२५० किलो वजनाचा लाडू बनवला आहे.
हैदराबाद येथील नागभूषण रेड्डी नावाच्या या व्यक्तीने अयोध्येत प्रभू रामाला अर्पण करण्यासाठी १२५० किलोंचा लाडू बनवला आहे; जो श्रीरामाला अर्पण केल्यानंतर मंदिरात प्रसाद म्हणून दिला जाईल. आज हा लाडू हैदराबादहून अयोध्येला रेफ्रिजरेटरमध्ये ठेवून नेला जाईल; जिथे पूजेनंतर तो प्रसाद म्हणून वाटला जाईल. एवढा मोठा लाडू आता लोकांच्या आकर्षणाचे केंद्र बनला आहे.
रामासाठी काहीतरी खास करण्याची इच्छा
या भव्य लाडूच्या कल्पनेबाबत नागभूषण यांनी सांगितले की, त्यांना राम मंदिरासाठी काहीतरी वेगळे करायचे होते. दरम्यान, २००० सालापासून ते श्रीराम केटरिंग चालवतात. त्यामुळे ज्याच्या नावावर आपला उदरनिर्वाह सुरू आहे, त्याची सेवा करण्याच्या इच्छेखातर त्यांनी हा लाडू अर्पण करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मंदिराच्या भूमिपूजनापासून ते उद्घाटन होईपर्यंत दररोज एक किलो लाडू मंदिराला देण्याचा निर्णय त्यांनी घेतला. तसेच प्राणप्रतिष्ठेमध्ये मोठा लाडू अर्पण करण्याची शपथ घेतली.
अशा प्रकारे तयार झाला मोठा लाडू
एवढा मोठा लाडू तयार करणे सोपे काम नव्हते. नागभूषण यांनी सांगितले की, हा लाडू बनवण्यासाठी खूप मेहनत घेण्यात आली आहे; जो बनवण्यासाठी २४ तास लागले. ३० जणांनी मिळून हा लाडू बनवला आहे. लाडूचे साहित्य तयार केल्यानंतर त्याला गोलाकार आकार देण्यासाठी चार तास लागले. त्यानंतर लाडूवर काजू, पिस्ता व बदाम टाकून जय श्रीराम लिहिले होते. आता हा लाडू फ्रिजमध्ये ठेवून हैदराबादहून अयोध्येला नेला जात आहे. तिथे नैवेद्य दाखवल्यानंतर तो वाटण्यात येईल.