रोमिओ आणि ज्यूलिएटचा अमेरिकेत जन्म झाला आहे…. हे वाचून तुम्हाला कदाचित धक्का बसेल. पण हे खरे आहे. अमेरिकेतील दक्षिण कॅरोलिनामध्ये या दोघांचा जन्म झाला आहे. योगायोग म्हणजे एकाच रुग्णालयात जन्मलेल्या या बाळांचे नाव रोमिओ आणि ज्यूलिएट असून जगभरात या बाळांची चर्चा सुरु आहे.

अमेरिकेत राहणाऱ्या मॉर्गन आणि एडविन हर्नाडेंज या दाम्पत्याने दक्षिण कॅरोलिनामधील एका रुग्णालयात बाळाला जन्म दिला. या बाळाचे नाव रोमिओ असे ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे याच रुग्णालयात ख्रिस्टियाना आणि अॅलन शिफलेट या दाम्पत्याला एक मुलगी झाली आहे. दाम्पत्याने त्यांच्या मुलीचे नाव ज्यूलिएट असे ठेवले आहे. या बाळांचे पोटो काढण्यासाठी एक छायाचित्रकार रुग्णालयात आला होता. या बाळांचे नाव बघून त्याला आश्चर्याचा धक्काच बसला आणि त्याने या दुर्मिळ योगायोगाची माहिती त्यांच्या पालकांना दिली. एकाच रुग्णालयात रोमिओ आणि ज्यूलिएटचा जन्म अशी पोस्ट या छायाचित्रकाराने फेसबूकवर अपलोड केली आणि अवघ्या काही क्षणातच ही पोस्ट व्हायरल झाली. छायाचित्रकाराने दोन्ही बाळांचे फोटोही पोस्टमध्ये शेअर केले आहेत.

दोन्ही बाळांच्या पालकांनी त्यांच्या मुलांचे नाव जन्माआधीच निश्चित केले होते. विशेष म्हणजे पालक एकमेकांना ओळखतही नव्हते. बाळांचे नाव ठेवताना आमच्यावर शेक्सपियरचा प्रभाव नव्हता. मालिकांमधील पात्रांवरुन आम्ही मुलांचे हे नाव ठेवले असे दोघांच्याही पालकांनी म्हटले आहे. शेक्सपियरच्या रोमिओ आणि ज्यूलिएटची प्रेमकथा आजही रसिकांच्या मनात स्थान करुन आहे. त्यामुळे दक्षिण कॅरोलिनामधील एका रुग्णालयात याचा नावांशी सांधर्म्य असलेले बाळ जगभरात चर्चेचा विषय ठरले आहेत.

Story img Loader