अमरावती : अंजनगाव सुर्जी येथील शाळेत खिचडी शिजवणाऱ्या बबिता सुभाष ताडे या ‘कौन बनेगा करोडपती’ मध्ये कोटय़धीश झाल्या असून जिल्ह्यातील कोटींपर्यंत झेप घेणाऱ्या त्या पहिल्या मानकरी ठरल्या आहेत. १८ व १९ सप्टेंबरला त्यांच्या प्रश्नोत्तराचा भाग प्रसारीत होणार आहे.
सोनी वाहिनीवरील कार्यक्रमात अभिनेते अमिताभ बच्चन यांनी विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरे देत त्या १ कोटींपर्यंत पोहोचल्या. स्पर्धेतील सहभागाविषयी अंजनगाव सुर्जी शहरात चर्चा होती. पण, जिंकलेल्या रकमेविषयी कुणालाही सांगितले नव्हते. त्याचा खुलासा कार्यक्रमाच्या टिझरमधून झाला अन् बबिता यांच्यावर शुभेच्छांचा वर्षांव झाला.
बबिता अंजनगाव सुर्जीतील श्रीमती पंचफुलाबाई हरणे विद्यालयात शालेय पोषण आहार शिजवून खाऊ घालण्याचे काम करतात. त्यांचे पती सुभाष ताडे हे याच विद्यालयात शिपाई आहेत. बबिता या पदवीधर आहेत. विवाहानंतर त्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला. त्यांना प्रापंचिक जबाबदाऱ्यांमुळे परीक्षा देता आल्या नाहीत, पण पुस्तकवाचनाची आवड त्यांनी कायम ठेवली. ताडे यांना एक मुलगी, एक मुलगा आहे. मुलगी पुण्याला शिक्षण घेत असून मुलगा अंजनगावातच शिकत आहे.
पुस्तक वाचनाची आवड त्यांना ‘कौन बनेगा’ या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रेरणादायक ठरली. स्पर्धेच्या अकराव्या पर्वात ३२ लाख इच्छुकांपैकी ४ हजार ८०० स्पर्धक पात्र ठरले होते. त्यातील १२० स्पर्धक ऑडिशनसाठी निवडले गेले. त्यातून बबिता यांना ‘हॉट सिट’ वर बसून प्रश्नांची उत्तरे देण्याची संधी प्राप्त झाली. त्यांनी सहजपणे प्रश्नांची उत्तरे दिली आणि एक कोटींचे बक्षीस जिंकले. त्याविषयीचा एक व्हिडीओ सार्वजनिक झाला असून त्यात अमिताभ बच्चन त्यांना एक कोटी रुपये जिंकल्याबद्दल अभिनंदन करताना दिसत आहेत. अमिताभ यांनी खिचडी शिजवण्याचे किती वेतन मिळते, असे विचारल्यावर त्यांनी पंधराशे रुपये असे उत्तर दिले. बबिता ताडे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करण्यास नकार दिला. कार्यक्रम प्रसारित झाल्यानंतर आपल्याला नक्कीच भावना प्रकट करता येऊ शकतील, असे त्या म्हणाल्या.