Mumbai News: मुंबईतील एका डॉक्टर कुटुंबामध्ये घडलेल्या घटनेने सर्वत्र खळबळ माजली आहे. वारंवार खोकला येत असल्याने आजारी पडलेल्या अडीच वर्षाच्या लहान बाळाला कफ सिरप देण्यात आलं. हे सिरप पिल्यानंतर या लहान बाळाचा अचानक श्वास थांबला. जवळपास २० मिनिटे हे बाळ त्याच अवस्थेत होतं. कुटुंबाने त्याची नाडी तपासली मात्र ती देखील बंद होती. हे पाहून डॉक्टर दाम्पत्य घाबरल. मात्र सुदैवानं या लहान बाळाला योग्य वेळी उपचार मिळाल्याने तो बरा झाला. खरं तर खोकला किंवा सर्दी झाली तर औषधांचा सर्रास वापर होतो. मात्र या घटनेने हा विषय चिंताजनक बनला आहे.
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, १५ डिसेंबरला डॉ. मंगेशकर यांच्या अडीच वर्षांच्या नातवाला खोकल्याचा त्रास सुरू झाला. यावेळी त्याच्या आईने त्याला एका नामांकित कंपनीचे कफ सिरप दिले. सिरप प्यायल्यानंतर २० मिनिटांनी हा लहान मुलगा अचानक बेशुद्ध पडला. यावेळी त्याचा श्वास थांबला होता आणि नाडी देखील बंद होती. पुढील २० मिनिटं तो याच स्थितीत होता. त्यामुळे त्याला या अवस्थेत पाहून कुटुंबातील सर्वचजण घाबरले. यानंतर त्याला हाजीअलीतील एसआरसीसी रुग्णालयात नेण्यात आलं. त्याठिकाणी त्याला सीपीआर देण्यात आला. त्यानंतर या लहान बाळाचा श्वास सुरू झाला.
( हे ही वाचा: २ रिक्षाचालकांचा रस्त्यावरील ‘तो’ डान्स होतोय Viral; नागालँडचे मंत्री Video शेअर करत म्हणाले, ‘लोकांनी…’)
या मुलाचा रक्तप्रवाह आणि श्वासोच्छवास पुन्हा सुरळीत होण्यास १७ मिनिटं लागल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. यावेळी डॉक्टरांनी खोकल्याच्या औषधामुळे हा प्रकार घडल्याची माहिती कुटुंबाला दिली. यानंतर डॉक्टर कुटुंबाने याबाबत माहिती मिळवण्यास सुरुवात केली. लहान बाळाला देण्यात आलेल्या कफ सिरपमध्ये क्लोरोफेनरामाईन आणि डेक्सट्रोमेथोर्फन यांचं कॉम्बिनेशन असल्याचे त्यांच्या लक्षात आलं. खरं तर हे औषध ४ वर्षांखालील मुलांना देऊ नये असं एफडीएनं सांगितलं आहे. मात्र अशा प्रकारची कोणतीही माहिती या कफ सिरपच्या बाटलीवर छापली नव्हती. हे औषध डॉक्टरदेखील प्रिस्क्राईब करतात.