प्राणी मूक असले म्हणून काय झाले, त्यांनाही भावना असतातच ना! त्यांनाही वेदना होतात, त्यांनाही दु:ख होतेच. आपल्या जवळचं कोणी गेलं की त्यांनाही दु:ख होतचं. काही दिवसांपूर्वी एका चिमण्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ‘ते मुके असले, प्राणी असले म्हणून काय झाले? त्यांनाही त्यांचा परिवार असतो आणि आपल्या परिवारातली एखादी व्यक्ती मेली की त्यांनांही त्रास होतोच” असं वाक्य त्यावर लिहिले होते. पण आपण मात्र या सगळ्या गोष्टींचा कधीच विचार करत नाही, कधी जाणूनबुजून तर कधी अनावधानाने त्यांना आपण मारतो, पण या मुक्या प्राण्यांचा जीव घेतल्यानंतर त्यांच्या पिल्लांचे काय होत असेल याचा विचार केलाय का कधी आपण? दगडालाही पाझर फुटेल असा माकडाच्या पिल्लाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

VIRAL VIDEO: आपल्या जखमी आईबरोबर ते पिल्लू बसून राहिलं

तामिळनाडू- कर्नाटक राष्ट्रीय महामार्गावरचा हा व्हिडिओ आहे. रस्ता क्रॉस करत असताना माकडीणीला गाडीची टक्कर बसली. यात तिचा जागीच मृत्यू झाला. मागून तिचे पिल्लू येते होते, आपली आई रस्त्यावर निपचित पडून आहे हे पाहून या पिल्लाने आईकडे धाव घेतली आणि तिला उठवण्याचा प्रयत्न केला. आपल्या एका हाकेने कुठूनही धावत येणारी, तिच्या पोटाला पकडून नेहमी सुरक्षिततेची भावना आणि मायेची ऊब देणारी आई आता यापुढे कधीच उठणार नाही हे एवढ्याशा पिल्लाला समजले. आईच्या चेह-याला पकडून ते कितीतरी वेळ तिच्या मृत शरीराकडे झोपून आक्रोश करत होते. रस्त्यावरून येणारे जाणरे मनुष्य या पिल्लाच्या आक्रोशाकडे फक्त बघून पुढे निघून जात होते, याच माणसांनी पिल्लाच्या आईचा जीव घेतला होता आणि कोणीही त्याच्या आईला परत आणणार नव्हते.

Story img Loader