Baipan Bhari Deva Style Saree: श्रावण महिन्यात दर मंगळवारी मंगळागौरीच्या पूजेची आणि मग झिम्मा फुगड्यांची परंपरा वर्षानुवर्षे चालत आली आहे. पण यंदा बाईपण भारी देवाची खास क्रेझ असल्याने मंगळागौरीच्या सोहळ्याचा उत्साह जणू काही द्विगुणित झाला आहे. एकीकडे श्रावणी सणांची धामधूम आणि दुसरीकडे मुंबापुरीत गणरायांच्या आगमन सोहळ्याची सुद्धा नांदी झाली आहे. गणेशोत्सव म्हटलं की लालबाग, काळाचौकी, परळचे भव्य दिव्य आगमन सोहळे आधी डोळ्यासमोर येतात. नुकतंच २७ ऑगस्टला काळाचौकीच्या महागणपतीचे आगमन झाले आहे. पारंपरिक पद्धतीने आगमनासाठी ओळखला जाणारा हा सोहळ्यात यंदा बाईपण भारी देवाची चांगलीच हवा पाहायला मिळाली.
गोडवा संस्कृतीचा या महिला गटाने काळाचौकीच्या महागणपतीच्या आगमनाला खास मंगळागौर करून प्रेक्षकांना भारावून टाकले होते. सायली पालांडे, कल्पना पार्टे, अर्चना मुरकर, मधुरा डोळस, अनुजा पार्टे, आश्लेषा शिंदे, श्रद्धा सकपाळ, प्रणाली, शुभदा पाटील, श्रद्धा गोसावी, सुषमा सकपाळ, वैष्णवी पाटील अशा १२ जणींच्या ग्रुपने आपल्या सुंदर पेहरावासह केलेल्या अत्यंत उत्साहपूर्ण नृत्याने सर्वांच्या नजरा खिळवून ठेवल्या होत्या.
गोडवा संस्कृतीचा या ग्रुपच्या प्रमुख सायली पालांडे यांनी लोकसत्ताशी खास बातचीत करताना सांगितले की, “काळाचौकीतील आगमन सोहळा हा नेहमीच पारंपरिक पद्धतीने पार पडत आला आहे. आपण श्रावणात ज्या उत्साहाने देवीची पूजा करतो, मंगळागौर खेळतो हाच उत्साह आम्हाला आगमनासाठीही होता म्हणून दोन्हीची सांगड घालून आम्ही हे सादरीकरण करायचे ठरवले. तब्बल १५ दिवस काम व शिक्षण सांभाळून आम्ही या पूर्ण डान्सचा सराव केला. यंदा बाईपण भारी देवा चांगलाच गाजला असल्याने गटातील प्रत्येकीने अगदी आवडीने तसाच लुक सुद्धा केला होता.”
दरम्यान, उपस्थितांनी सुद्धा या महिलांच्या उत्साहाला कौतुकाची दाद दिली आहे. मुंबईकरांसाठी गणपती ही परंपरा आहे आणि त्या परंपरेचे हे सुंदर स्वरूप तुम्हाला कसे वाटले हे कमेंट करून नक्की कळवा.