महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी आपल्या ५४ व्या वाढदिवासानिमित्त कोणालाही भेटता येणार नसल्याचं जाहीर केलं असल्याने आज राज यांच्या वाढदिवसानिमित्त मनसे कार्यकर्त्यांकडून नाराजी व्यक्त केली जातेय. दरवर्षीप्रमाणे यंदा राज यांची भेट घेण्याची अनेक कार्यकर्त्यांची इच्छा अपूर्ण राहणार. राज यांनी स्वत: १२ तारखेला यासंदर्भातील एक ऑडिओ नोट पोस्ट केली होती. त्यानुसार राज आज मनसेच्या कोणत्याही नेत्यांची, पदाधिकाऱ्यांची, कार्यकर्त्यांची भेट घेणार नाहीत. त्यामुळेच अनेकजण राज यांना सोशल मीडियावरुनच शुभेच्छा देत आहेत. मनसेचे वरिष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनीसुद्धा सोशल नेटवर्किंगवरुन भावनिक पोस्ट करत राज यांना शुभेच्छा देताना भेटीचा हा दुरावा लवकर संपावा अशी इच्छा व्यक्त केलीय. याचबरोबर राज ठाकरेंवर होणाऱ्या शस्त्रक्रीयेच्या तारखेसंदर्भातही नांदगावकर यांनी या पोस्टमध्ये माहिती दिलीय.
नक्की पाहा >> Photos: अभ्यंगस्थान करणारे फडणवीस, पतंग उडवणारे मोदी अन् आकडे फेकणारे गडकरी… राज ठाकरेंची गाजलेली ४५ व्यंगचित्रे
बाळा नांदगावकरांनी राज ठाकरेंच्या भावमृद्रा असणारं चित्र पोस्ट करत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. “आज राजसाहेबांचा वाढदिवस, या दिवसाची वाट त्यांचे सर्वच चाहते, कार्यकर्ते, हितचिंतक वर्षभर पाहत असतात. राज्यातून तसेच देशातील अनेक ठिकाणांहून हजारो जण या दिवशी त्यांची प्रत्यक्ष भेट घेतात. राज ठाकरेही या सर्वांना आवर्जून काही क्षणांसाठी तरी नक्की भेटतात,” असं नांदगावकर यांनी म्हटलंय.
पुढे नांदगावकर यांनी राज ठाकरेंवर उद्या म्हणजेच १५ जून रोजी शस्त्रक्रीया होणार असल्याचं नमूद केलं आहे. “उद्या होणाऱ्या शस्त्रक्रियेमुळे यावेळी ही भेट होणार नसली तरी याने राज ठाकरेंबद्दल सर्वांप्रति असलेला जिव्हाळा कमी होणार नाही. हे वर्ष व इथून पुढील अनेक वर्षे त्यांच्या नेतृत्वाखाली आपल्या मनसेला सुवर्णकाळ येणार हे निश्चित. आज जरी त्यांची भेट होणार नसली तरी लवकरच हा दुरावा मिटेल व आपणा सर्वांना ते भेटतील. तुम्हाला लवकर स्वास्थ्य लाभो, हिच या दिनी शुभेच्छा,” असं नांदगावकर यांनी म्हटलंय.
नक्की वाचा >> Raj Thackeray Birthday: यंदा वाढदिवसानिमित्त कोणालाही भेटणार नाही असं म्हणणारे राज मध्यरात्रीनंतर गॅलरीत आले अन्…

भेटून बरं वाटतं पण…
माझ्या शरीरात ‘कोविड डेड सेल’ असल्यानं घरी क्वारंटाईन असल्याची माहिती देत शस्त्रक्रियेसाठी यंदा वाढदिवसानिमित्त १४ जूनला मी कोणालाही भेटू शकत नसल्याचं राज यांनी यापूर्वीच स्पष्ट केलेलं. “माझ्या महाराष्ट्र सैनिकांनो, पुण्यातील सभेत मी सर्वांना सांगितलं की माझी एक शस्त्रक्रिया करायची आहे. मी जेव्हा रुग्णालयात दाखल झालो तेव्हा चाचणीनंतर डॉक्टरांनी ‘कोविडचा डेड सेल’ असल्याचं सांगितलं. ते काय आहे हे मला माहिती नाही, पण ती शस्त्रक्रिया रद्द झाली. आता मी कोविडमुळे १०-१५ दिवस घरी क्वारंटाईन आहे. या सगळ्या दरम्यान १४ जूनला माझा वाढदिवस आला आहे. दरवर्षी तुम्ही सर्वजण प्रेमाने उत्साहाने मला भेटायला येतात. मी देखील आपली सर्वांची आतुरतेने वाट पाहत असतो. सर्वांना भेटल्यावर बरं वाटतं. असं असलं तरी यावर्षी १४ जूनला मला कोणालाच भेटता येणार नाही. कारण या गाठीभेटींमध्ये पुन्हा संसर्ग झाला आणि परत शस्त्रक्रिया पुढे ढकलावी लागली तर शेवटी मी शस्त्रक्रिया किती पुढे ढकलायची यालाही काही मर्यादा आहेत. त्यामुळे पुढील आठवड्यात माझी शस्त्रक्रिया ठरली आहे. त्यामुळे मी कोणत्याही प्रकारचा धोका पत्करू इच्छित नाही. म्हणून मी १४ जूनला कोणालाही न भेटण्याचा निर्णय घेतला आहे,” असं राज यांनी ऑडिओ क्लीपच्या माध्यमातून म्हटलं होतं.
माझी शस्त्रक्रिया पूर्ण होईल आणि बरं वाटायला लागेल तेव्हा मी आपणा सर्वांना निश्चित भेटेन. त्यामुळे १४ जूनला आपण कोणीही घरी येऊ नये ही विनंती,” असं आवाहनही राज ठाकरेंनी समर्थकांना केलंय.