असं म्हणतात, बोलणाऱ्यांची माती सुद्धा विकली जाते, या म्हणीला जरा जास्तच गांभीर्याने घेत Balenciaga’s या लक्जरी ब्रँडने नुकतीच आपली एक हटके डिझाईन लाँच केली आहे, जिची किमंत ऐकून अक्षरशः डोकं चक्रावून जाईल. Balenciaga’s ने विंटर २२ कलेक्शनमध्ये चक्क एक कचऱ्याची पिशवी जगासमोर सादर केली होती आणि पिशवीची किंमत तब्बल १ लाख ४० हजार इतकी आहे. बसला ना धक्का? अर्थात आपल्याकडे ५० रुपयात १५० कचऱ्याच्या पिशव्या मिळत असताना ही अशी काय बरी वेगळी डिझाईन आहे ज्यासाठी जवळपास दीड लाखाचा मोबदला द्यावा लागतोय हा प्रश्न अनेकांना पडला आहे. ट्विटर वर अनेकांनी उपहासात्मक पद्धतीने या कचऱ्याच्या पिशवीवर मजेशीर कमेंट केल्या आहेत पण कंपनीच्या मते ही काही साधी कचऱ्याची पिशवी नसून यात अनेक खास गोष्टी दडल्या आहेत असे सांगण्यात येत आहे.
Balenciaga’s ची कचऱ्याची पिशवी सध्या काळा, निळा व पांढरा या तीन रंगात उपलब्ध आहे. साधारण एका नजरेत पाहता चमकणारा पृष्ठभाग व वर एक पिशवीचं तोंड बांधायला दोरी इतकंच हे डिझाईन दिसून येतं. पण कंपनीच्या माहितीनुसार ही पिशवी बनवण्यासाठी चक्क calfskin चामड्याचा वापर करण्यात आला आहे. यावर कंपनीचा लोगो पाहायला मिळतो, कदाचित या लोगोमुळेच ही पिशवी लाखोंच्या दरात विकली जात आहे.
नेमकी कशी दिसते १.४ लाखाची कचऱ्याची पिशवी
Balenciaga चे अन्य महागडे डिझाईन
Balenciaga ही कंपनी मुळात अत्यंत सर्वसामान्य दिसणाऱ्या वस्तू महागात विकण्यासाठी प्रसिद्ध आहे. मागील वर्षी त्यांनी ‘destroyed’ crewneck jumper’ म्हणजेच सोप्या शब्दात सांगावं तर एक रंग गेलेलं स्वेटर तब्बल १ लाख १८ हजार ३६० रुपयात लाँच केलं होतं. या निळ्या स्वेटरचे अनेक धागे निघाले होते मात्र हा लुक मुद्दाम दिल्याचं सांगून कंपनीकडून विक्री केली होती. हे स्वेटर इटली मध्ये बनवण्यात आलं असून यात १००% व्हर्जिन लोकरीचा वापर केल्याचा दावा करण्यात आला होता.
हे ही नसे थोडके म्हणून Balenciaga ने भारतीय घरोघरी दिसणाऱ्या भाजीच्या पिशवीला सुद्धा फॅन्सी मेकओव्हर देत दीड लाखाला लाँच केलं होतं. आता काही दिवसात Balenciaga ने हवा किंवा पाणी बॉटल मध्ये भरून लाखोंना विकलं तरी आश्चर्य वाटणार नाही अशा कमेंट अनेक ट्विटर युजर्सने केल्या आहेत.