दक्षिण आफ्रिकेविरूद्ध तिस-या कसोटीत चेंडू कुरतडल्याचं स्पष्ट झाल्यानंतर ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये मोठं वादळ आल्याचं पाहायला मिळत आहे. स्टीव्ह स्मिथला कर्णधारपदावरुन तातडीने हटवा असे आदेश ऑस्ट्रेलिया सरकारने क्रिकेट ऑस्ट्रेलियाला दिल्यानंतर काहीवेळातच कर्णधार स्मिथ आपल्या पदावरून पायउतार झाला आहे. त्यामुळे यष्टीरक्षक-फलंदाज टीम पेन ऑस्ट्रेलिया संघाचं नेतृत्व करेल. याचसोबत डेव्हिड वॉर्नरनेही उप-कर्णधारपदाचा राजीनामा दिलाय. क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे प्रमुख जेम्स सदरलँड यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.
दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या तिस-या कसोटी दरम्यान ऑस्ट्रेलियाचा खेळाडू कॅमेरून बेनक्रॉफ्ट हा चेंडू एका पिवळसर वस्तूशी घासत असल्याचे टेलिव्हिजन चित्रिकरणात स्पष्ट दिसलं. धक्कादायक म्हणजे या घटनेनंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने मीडियासमोर चेंडूशी छेडछाड चुकीने नाही तर रणनितीचाच भाग होता असं मान्य केलंय. या प्रकारामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाची प्रतिमा चांगलीच डागाळली असून क्रिकेटविश्वातून ऑस्ट्रेलियावर टीकेचा भडीमार होत आहे.
स्मिथची कबुली –
चेंडूशी छेडछाड करून आफ्रिकेच्या फलंदाजांना नामोहरम करण्याचा आमचा प्रयत्न होता, संपूर्ण संघाला याबाबत माहिती होती, असं स्मिथने मान्य केलं. ही जबाबदारी कॅमेरून बेनक्रॉफ्ट याच्यावर सोपावण्यात आली होती असंही तो म्हणाला. तीस-या दिवसाचा खेळ संपल्यानंतर स्टीव्ह स्मिथ आणि कॅमेरून बेनक्रॉफ्ट पत्रकार परिषदेत आले. जे काही झालं ते टीव्ही कॅमे-यांमध्ये रेकॉर्ड झालं आहे. हा महत्वाचा सामना होता. पण चेंडूपासून कोणतीच मदत मिळत नसल्याचं पाहून सामन्यात पुनरागमन करता यावं यासाठी संघातील काही खेळाडूंनी चेंडूशी छेडछाड करण्याचा प्रयत्न केला, अशी कबुली स्मिथने दिली. त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाईल असं क्रिकेट ऑस्ट्रेलियाने म्हटलं. पण थोड्यावेळातच ऑस्ट्रेलिया सरकारने स्टीव्ह स्मिथला कर्णधारपदावरुन तातडीने काढून टाका असा आदेश क्रिकेट ऑस्ट्रेलियाला दिला. त्यानंतर काही वेळातच कर्णधार स्मिथ आपल्या पदावरून पायउतार झाला आहे.
BREAKING: Steve Smith and David Warner have stood down as captain and vice-captain for the remainder of this Test. More to come #SAvAUS
— cricket.com.au (@CricketAus) March 25, 2018