बनारसी पान आणि लंगडा आंबा या दोहोंना आता एक नवी ओळख मिळाली आहे. त्यामुळे काशीचं नाव सध्या चर्चेत आहे. काशी हे असं ठिकाण ठरलं आहे ज्या शहरातली २२ मूळ उत्पादनं GI (Geographical Indication) च्या यादीत जाऊन बसली आहेत. या यादीत आता लंगडा आंबा आणि बनारसी पान यांचा समावेश झाला आहे. उत्तर प्रदेशातल्या एकूण ४५ पदार्थांना GI चा दर्जा मिळाला आहे. त्यातली काशीमध्ये २२ उत्पादनं आहेत.
डॉ. रजनीकांत यांनी काय सांगितलं?
जीआय विशेष तज्ज्ञ पद्मश्री डॉ. रजनीकांत यांनी सांगितलं की नाबार्ड आणि उत्तर प्रदेशच्या योगी सरकारच्या सहाय्याने या वर्षी ११ उत्पादनांना GI चा टॅग मिळाला आहे. ज्यामध्ये बनारसी पान आणि लंगडा आंबा यांचा समावेश झाला आहे. आता आपल्या या नव्या ओळखीसह आंतरराष्ट्रीय बाजारात हे दोन्ही ओळखले जातील.
बनारसी थंडाई, लाल भरवा मिरची आणि तिरंगी बर्फीही प्रतीक्षेत
डॉ. रजनीकांत यांनी दिलेल्या माहितीनुसार बनारस आणि पूर्वांचलच्या सगळ्या जीआय उत्पादनांमध्ये एकूण २० लाख लोकांचा सहभाग आहे. तसंच या उत्पादनांची वर्षाची आर्थिक उलाढाल २५ हजार कोटींच्या घरात असते. सध्या तिरंगी बर्फी, भरवा मिरची आणि बनारसी थंडाई ही उत्पादनंही जीआयच्या रांगेत जाऊन बसण्याची वाट पाहात आहेत.
बनारसी पान आणि लंगडा आंबा यांना जीआय टॅग मिळाल्याने जगभरातले लोक या आंब्याचा आणि पानाचा आस्वाद घेऊ शकणार आहेत. लंगडा आंबा आता लंडन, कॅनडा, दुबई, अमेरिका, जपान या शहरांमध्येही पाठवला जाईल. यामुळे लंगडा उत्पादक शेतकऱ्यांना चांगलाच फायदा होऊ शकणार आहे.
जीआय तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार बनारसचा लाल पेढा, तिरंगी बर्फी, बनारसी थंडाई, लाल भरवा मिरची या सगळ्यांनाही लवकरच GI टॅग मिळणार आहे.कोविडच्या काळात उत्तर प्रदेशातल्या २० उत्पादनांची नावं पाठवण्यात आली होती. त्यापैकी लंगडा आंबा आणि बनारसी पान यांची नावं जीआयच्या यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत.