Bangladesh Violence Viral Video : बांगलादेशातील अलीकडील अशांततेमुळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेक दिशाभूल करणाऱ्या पोस्ट शेअर केल्या जात आहेत. लाइटहाऊस जर्नलिझमला अशीच एक पोस्ट आढळली, ज्यात एका तरुणीचे हात- पाय बांधलेले होते आणि ती सार्वजनिक ठिकाणी बसली होती, तिच्या तोंडावर टेपही चिकटवलेली दिसली. व्हिडीओमध्ये एक व्यक्ती व्हिडीओ कॅमेरा घेऊन जात असल्याचेही त्यात दिसतेय. शेख हसीना यांचे सरकार पाडल्यानंतर बांगलादेशी हिंदूंवर अशाप्रकारे अत्याचार केले जात असल्याचा दावा या व्हिडीओ पोस्टद्वारे करण्यात आला आहे. पण, आम्ही व्हिडीओची पडताळणी केली असता त्यामागची सत्य माहिती समोर आली आहे. हे सत्य नेमकं काय आहे जाणून घेऊ…
काय होत आहे व्हायरल?
X युजर Jitendra Pratap Singh ने हा व्हिडीओ आपल्या प्रोफाइलवर शेअर केला.
इतर वापरकर्तेदेखील असाच दावा करत व्हिडीओ शेअर करत आहेत.
तपास:
आम्ही व्हिडीओवरून मिळवलेल्या कीफ्रेमवर रिवर्स सर्च करून तपास सुरू केला.
यावेळी दोन दिवसांपूर्वी फेसबुकवर अपलोड केलेला एक व्हिडीओ आम्हाला आढळला.
व्हिडीओच्या शीर्षकावरून हा व्हिडीओ बांगलादेशच्या ढाकामधील जगन्नाथ विद्यापीठातील असल्याचे सूचित केले जात होते.
आम्हाला ‘JnU Short Stories’ नावाच्या फेसबुक पेजवरदेखील हा व्हिडीओ पोस्ट केलेला आढळला.
याच्या वर्णनात म्हटले आहे (अनुवाद) : तुमच्या अफवांमुळे मुलगी आज मानसिक आघातातून जात आहे. ही मुलगी २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात बांगलादेशातील जगन्नाथ विद्यापीठाची नियमित विद्यार्थिनी आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या अवंतिकाच्या आत्महत्येचा निषेध दर्शवण्यासाठी केलेल्या पथनाट्याचा हा व्हिडीओ आहे. परंतु, काही लोकांनी फेसबुकवर व्हिडीओ शेअर केला, ज्यात ही मुलगी सध्याच्या आंदोलनाच्या काळात छाता लीगची नेता असल्याचे म्हणून सांगितले जात आहे , जे आता खूप व्हायरल झाले आहे, हे पाहून मुलगी मानसिक आघातातून जात आहे. आज अवंतिकासारख्या मुलीने आत्महत्या केली तर तिची जबाबदारी कोण घेणार? सर्व जण त्या मुलीच्या पाठीशी उभे आहेत. जिथे जिथे हा व्हिडीओ दिसेल तिथे कमेंटमध्ये निषेध नोंदवा. कृपया ही पोस्ट जास्तीत जास्त शेअर करून ही अफवा थांबवा.
Read More News On Fact Check : bangladesh crisis : शेख हसीनांच्या राजीनाम्यानंतर भारतीय लष्कर बांगलादेश विमानतळावर दाखल? Video नेमका कधीचा? अखेर सत्य आलं समोर
कॅप्शनमधून असे सूचित होते की, बांगलादेशातील काही दिवसांपूर्वीचा हा व्हिडीओ आजच्या बांगलादेशशी तुलना करून दिशाभूल करणाऱ्या दाव्यांसह व्हायरल केला जात आहे.
जगन्नाथ विद्यापीठाच्या विद्यार्थ्याच्या आत्महत्येबाबतही आम्हाला काही बातम्या आढळल्या.
त्यानंतर आम्ही बांगलादेशातील तन्वीर महताब अबीर या वरिष्ठ तथ्य तपासकांशी संपर्क साधला. त्यांनी आम्हाला सांगितले, “गेल्या मार्चमध्ये बांगलादेशमधील ढाका येथील जगन्नाथ विद्यापीठाच्या संगीत विभागातील एका सामान्य विद्यार्थ्याने केलेल्या मूक निषेधाचे हे दृश्य आहे.”
निष्कर्ष:
बांगलादेशच्या जगन्नाथ युनिव्हर्सिटीत केलेल्या मूक निषेधाचा जुना व्हिडीओ अलीकडील सांगून व्हायरल होत आहे. ज्यात असा दावा केला आहे की, बांगलादेशात सध्या हिंदूंवर अत्याचार केले जात आहेत. पण, हे सर्व व्हायरल दावे दिशाभूल करणारे आहेत.