Bangladeshi Women Cheated By Indian Man: प्रेमाच्या नावावर पाकिस्तानची सीमा ओलांडून आलेल्या सीमा हैदरचं प्रकरण अजूनही चर्चेत आहे. त्यात मागील काही दिवसांपासून याच पद्धतीचे अनेक प्रकार समोर येत आहेत. सीमा पाठोपाठ अंजु, दीपिकाच्या सीमापार प्रेमकहाण्या चर्चेत होत्याच आणि आता बांगलादेशमधून भारतात आलेल्या सोनियाची कहाणी सुद्धा भुवया उंचावत आहे. बांगलादेशवरून आपल्या लेकराला घेऊन आलेल्या सोनियाने उत्तर प्रदेश पोलिसांकडे पतीच्या विरुद्ध तक्रार नोंदवली आहे. तक्रार करताना तिने आपल्याला फक्त आपल्या पतीबरोबर राहायचे आहे अशी मागणी केली आहे. नेमकं हे नवं प्रकरण काय हे जाणून घेऊया..
प्राप्त माहितीनुसार, नोएडा येथे राहणाऱ्या पतीबरोबर राहण्यासाठी सोनिया बांगलादेशमधून निघून आली आहे. तीन वर्षांपूर्वी सोनिया हिचे ढाका येथे सौरभ कांत तिवारी नामक व्यक्तीशी लग्न झाले होते. मात्र लग्नानंतर सौरभ तिला सोडून भारतात आला आता तो सेंट्रल नोएडातील सूरजपूर भागात राहतो. महिलेने स्वत:ची ओळख ढाका येथील रहिवासी सोनिया अख्तर अशी सांगितली आहे.
सोनियाने सांगितले की, “माझा नवरा मला त्याच्या घरी घेऊन जात नाही. मी बांगलादेशी आहे. आमचे लग्न जवळपास तीन वर्षांपूर्वी झाले आहे. मला फक्त आमच्या मुलासह माझ्या पतीबरोबर राहायचे आहे”. तिच्या तक्रारीच्या आधारे नोएडा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. अतिरिक्त डीसीपी (मध्य नोएडा) राजीव दीक्षित यांनी सांगितल्याप्रमाणे सौरभ तिवारी आधीच विवाहित असल्याचा दावाही महिलेने केला आहे. सोनियानेबांगलादेशी नागरिकत्व कार्डासह व्हिसा, स्वतःचा आणि तिच्या मुलाचा पासपोर्ट तपशील प्रदान केला आहे.
हे ही वाचा<< सीमा हैदर मोदी व अमित शाहांची बहीण होणार? मोहन भागवतांना राखी पाठवतानाचं भाषण ऐकून नेटकरी हैराण
दरम्यान, सदर तपास एसीपी (महिला आणि बाल सुरक्षा) विभागाकडे सोपवण्यात आला आहे जेणेकरून प्रकरणाचा सर्व तपशील पाहिला जाईल आणि त्यानुसार पुढील कारवाई केली जाईल. आतापर्यंतच्या माहितीनुसार, सौरभ कांत तिवारी ४ जानेवारी २०१७ ते २४ डिसेंबर २०२१ या कालावधीत बांगलादेशातील ढाका येथे एका खाजगी कंपनीत काम करत होते. त्यांनी १४ एप्रिल २०२१ रोजी इस्लामिक पद्धतीने विवाह केला होता, तर त्याचे लग्न एका भारतीय महिलेशी सुद्धा झाले आहे जिच्यापासून त्यांना दोन मुले आहेत.