रस्ता शोधण्यासाठी सध्या सर्वत्र गुगल मॅपचा सर्रास वापर केला जातो. जगभरात गुगलचं हे अॅप लोकप्रिय आहे. पण गुगल मॅप नेहमीच तुम्हाला बरोबर रस्ता दाखवेल असं नाहीये, अनेकदा गुगल मॅपद्वारे चुकीचा मार्ग किंवा उपलब्ध मार्ग न दाखवता वेगळाच मार्ग दाखवण्यात आल्याचं समोर आलं असेल.
जर तुम्ही गोव्याला फिरायला गेला असाल तर याचा अनुभव तुम्हाला नक्कीच आला असेल. गोव्यातील रस्त्यांवर गुगल मॅपबाबत अशाच प्रकारचं एक बॅनर लागलं असून ते सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालं आहे.
गुगल मॅप गोव्यातील पर्यटकांसाठी सध्या डोकेदुखी ठरतंय. गोव्यातील प्रसिद्ध समुद्र किनारपट्टी म्हणजे बागा बिचवर जाण्यासाठी गुगल मॅपचा वापर करणारे पर्यटक रस्ता भरकटून भलत्याच रस्त्यावर जात आहेत. याला कारण ठरतंय ते म्हणजे गुगल मॅप. कारण, या अॅपद्वारे बागा बिचच्या रस्त्याची निवड केल्यास एका ठरावीक ठिकाणावरुन या अॅपवर चुकीचा रस्ता अपडेट करण्यात आला आहे. परिणामी बागा बिचला जाण्याऐवजी पर्यटक भलत्याच ठिकाणी पोहोचत आहेत.
Hahaha. @googlemaps what’s the route to Baga beach?
Photo credits: masud. pic.twitter.com/0K2wK2TQD2— Sumanth Raj Urs (@tweesumz) February 16, 2019
‘बागा बीच’ जाण्यासाठी रस्त्यावर बॅनर –
उत्तर गोव्यातील एका व्यक्तीने बागा बिचवर जाण्यासाठी रस्त्यावर एक बॅनर लावलं आहे. यावर, ‘गुगल मॅपने तुम्हाला मुर्ख बनवलं आहे. हा रस्ता बागा बिचकडे जात नाही…मागे फिरा आणि डाव्या बाजूला वळण घ्या…बागा बिच तेथून एक किलोमीटर दूर आहे’. अशा आशयाचा संदेश या बॅनरवर लिहीला आहे. @tweesumz या ट्विटर हँडलवरुन हे बॅनर सर्वप्रथम शेअर करण्यात आलं. त्यानंतर हे बॅनर सोशल मीडियावर व्हायरल झालं आणि पर्यटकांनी व सोशल युजर्सनी बॅनरसाठी त्याचे आभार मानले आहेत. यासोबत सोशल मीडियावर अनेकांनी बागा बिचवर जाताना रस्ता चुकल्याचा त्यांचा अनुभव देखील सांगितला आहे.