अठराव्या लोकसभा निवडणुकीत निवडून आलेल्या खासदारांचा शपथविधी कार्यक्रम संसदेत सुरू आहे. महाराष्ट्रातील अनेक खासदारांनी मराठीत शपथ घेतली. तर अहमदनगरचे खासदार निलेश लंके यांनी इंग्रजीत शपथ घेऊन सुजय विखे पाटील यांना दिलेले आव्हान पूर्ण केले. तर भाजपाच्या खासदार आणि दिवंगत सुषमा स्वराज यांची मुलगी बांसुरी स्वराज यांची संस्कृतमधून शपथ घेतल्यामुळे सुषमा स्वराज यांची पुन्हा एकदा आठवण काढली जात आहे. सुषमा स्वराज या त्यांच्या वक्तृत्वासाठी ओळखल्या जात होत्या. बांसुरी स्वराज यांनी संस्कृतमधून शपथ घेतल्यानंतर नेटिझन्सनी दोघींचे व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बांसुरी स्वराज या नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदाच निवडणुकीसाठी उभ्या राहिल्या होत्या. आम आदमी पक्ष आणि काँग्रेसची आघाडी असतानाही मोठ्या मताधिक्याने त्या याठिकाणी निवडून आल्या. सोमवारी त्यांनी संसदेत संस्कृतमधून शपथ घेतली. हा व्हिडीओ अनेकांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.

दिल्लीत ‘अटीतटीचं’ राजकारण! “लोकसभा अध्यक्षपदासाठी एनडीएला पाठिंबा देऊ पण…”; राहुल गांधींचं वक्तव्य

एका युजरने सुषमा स्वराज आणि बांसुरी स्वराज या दोघींचे व्हिडीओ एकत्र करून सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. “जशी आई, तशी लेक”, असे इंग्रजीत कॅप्शन लिहून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

बांसुरी स्वराज यांना भाजपाने पहिल्यांदाच नवी दिल्लीसारख्या महत्त्वाच्या लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी उभे केले होते. याठिकाणी आम आदमी पक्षाचे सोमनाथ भारती विरोधात उभे होते. मात्र बांसुरी स्वराज यांनी तब्बल ७८,३७० मतांनी विजय मिळविला.

कसा होता अठराव्या लोकसभेचा पहिला दिवस?

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि ‘इंडिया’मध्ये संविधानाच्या मुद्द्यावरून सुरू झालेला वाद सोमवारी, १८व्या लोकसभेच्या पहिल्या संसद अधिवेशनातही कायम राहिला. सोमवारी, काँग्रेससह विरोधी पक्षांचे खासदार राज्यघटनेची प्रत घेऊन आले आणि परिसरात निदर्शने केली. याला प्रत्युत्तर देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘आणीबाणी’ची आठवण करून दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी आणीबाणीच्या ५० वर्षांचा उल्लेख केला. “आज आपण २४ जूनला भेटत आहोत. उद्या २५ जून आहे. २५ जूनला भारताच्या लोकशाहीवर काळा डाग लागला होता, त्याला ५० वर्षं पूर्ण होत आहेत. भारताची नवीन पिढी ही बाब कधीच विसरणार नाही की भारताच्या संविधानाला तेव्हा पूर्णपणे नाकारले गेले होते. आज देशातले नागरीक संकल्प करतील की ५० वर्षांपूर्वी केली गेलेली कृती पुन्हा करण्याची भारतात कधी कुणी हिंमत करणार नाही. आपण जिवंत लोकशाहीचा संकल्प करूयात”, असे मोदी म्हणाले.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bansuri swaraj takes oath in sanskrit netizens share old clip of her mother sushma swaraj kvg