बार्सिलोनामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर तिथे राहणाऱ्या शीख समाजानं जखमींना मदतीचा हात पुढे करत गुरूद्वाराचे दार उघडले. बार्सिलोनातील लास रॅमब्लासमध्ये एका पांढऱ्या व्हॅनने पदपथावरुन चालणाऱ्या काही जणांना चिरडले. व्हॅनच्या धडकेत १३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर पन्नासहून अधिक जण जखमी झाले आहेत. या दहशतवादी हल्ल्यानंतर लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. तेव्हा जखमींना आणि इतर लोकांना मदत करण्यासाठी शीख बांधव पुढे आले.

हरविंद कुकरेजा यांनी ट्विटच्या माध्यमातून स्पनिश नागरिकांना ही माहिती दिली आहे. जर कोणालाही मदतीची गरज असेल तर त्यांनी जवळच्या गुरूद्वाऱ्यात निसंकोचपणे जाण्याची विनंतीही त्यांनी केली आहे. दहशतवादी हल्ल्यानं स्पेन हादरलं. यावेळी जखमींना मदत करण्यासाठी गुरूद्वाऱ्याचे दार खुले करण्यात आले. नागरिकांना निवाऱ्यासोबतच अन्न आणि इतर औषधपाण्याचीही सोय तिथे करण्यात आली होती.

असं पहिल्यांदाच होत नाहीय. तर यापूर्वीही अनेकदा परदेशात राहणाऱ्या शीख समाजानं मदतीचे हात पुढे केले होते. लंडन स्फोटाच्यावेळीही देखील तिथल्या शीख बांधवांनी अनेकांना मदत केली होती.

Story img Loader