क्रिकेट सामना सुरु असताना अनेकदा फलंदाज बाद झाल्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीने राग काढत असतात. बॉलरशी होणारी बाचाबाची किंवा पंचांशी वाद होणे हे आपण नेहमीच पाहिलं आहे. पण कधी एखाद्या फलंदाजाने बॅट तोडून आपला राग व्यक्त केल्याचं तुम्ही पाहिलं आहे का ? नसेलच…पण नुकतंच एका सामन्यात फलंदाजाने बाद मंकडेड पद्धतीने झाल्यानंतर रागाच्या भरात मैदानातच बॅट तोडल्याचं समोर आली आहे. यामधून त्याने आपल्या अखिलाडू वृत्तीचं दर्शन घडवलं असल्याची टीका होत आहे.
फलंदाजाचा बॅट तोडतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत गोलंदाजाने मंकडेड पद्धतीने रन आऊट केल्यानंतर नाराज झालेला फलंदाज मैदानात बॅट जोरजोरात जमिनीवर आपटून तोडून टाकताना दिसत आहे. यानंतर धावत तो ड्रेसिंग रुममध्ये जातो आणि तिथे असणाऱ्या खूर्च्यांवर लाथ मारुन पुन्हा आपला राग व्यक्त करतो.
राष्ट्रवादी चषक 2018 या स्थानिक क्रिकेट स्पर्धेतील सामन्यारम्यान हा प्रकार घडला आहे. पुण्यातील लोहगाव येथे हा सामना सुरु होता. 12 ते 17 डिसेंबर दरम्यान ही स्पर्धा पार पडली. हा टेनिस बॉलने खेळला जाणारा सामना होता जिथे आठ ओव्हर्सची मर्यादा ठेवण्यात आली होती.
शिवशंभू स्पोर्ट आणि दादाची वस्ती स्पोर्ट्स एकमेकांविरोधात खेळत असताना हा वादग्रस्त प्रकार घडला. व्हिडीओत दिसत असलेल्या स्कोअर बोर्डनुसार शिवशंभू संघ प्रथम फंलदाजी करत होती. सात ओव्हर्समध्ये शिवशंभू संघाने 3 विकेट्स गमावत 75 धावा केल्या होत्या. शेवटच्या ओव्हरमध्ये मोठी धावसंख्या उभारण्यावर संघाचं लक्ष होतं. पण पहिल्याच चेंडूवर गोलंदाजाने चातुर्य दाखवत फलंदाजाला मंकडेड पद्धतीने बाद केलं.
Only in India pic.twitter.com/6j2HuACd4B
— Shoaib Jatt (@Shoaib_Jatt) December 18, 2018
नॉन स्ट्राइकला असणारा फलंदाज फार पुढे निघून गेला होता ज्याचा फायदा घेत गोलंदाजाने मंकडेड पद्धतीने फलंदाजाला बाद केलं. अशा पद्धतीने आऊट झाल्यामुळे संतापलेल्या फलंदाजाने तिथेच बॅट जमिनीवर आदळत तोडली आणि ड्रेसिंग रुमकडे धाव घेतली.
मंकड पद्धत म्हणजे काय –
जवळपास 70 वर्षांपूर्वी म्हणजे 1947 मध्ये भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात विनू मंकड यांनी ऑस्ट्रेलियाचे फलंदाज बिल ब्राऊन यांना दोनवेळा धावचीत केले होते. मंकड गोलंदाजी करत असताना त्यांनी चेंडू टाकण्यापूर्वी ब्राऊन क्रीझ सोडत. मंकड यांनी असं करताना दोनवेळा त्यांना बाद केले. यानंतर अशा पद्धतीने आऊट होण्याच्या पद्धतीला मंकड असं नाव ठेवण्यात आलं.