एव्हाना बीबीसीचे प्रोफेसर ‘केली’ सगळ्यांनाच माहिती झाले असतील. त्यांच्या घरात लाइव्ह कार्यक्रमादरम्यान घडलेल्या गंमतीशीर प्रसंगाने दोन दिवस का होईना सगळ्या नेटीझन्सना खळखळून हसण्याचे कारण मिळाले होते. बीबीसीवर एका आंतरराष्ट्रीय विषयावर चर्चा होती आणि त्या विषयातले तज्ज्ञ म्हणून बीबीसीच्या चर्चेत ते सहभागी झाले होते. अर्थात आपल्या घरातल्या एका खोलीत बसून स्काईपवरून ते चर्चेत सहभागी झाले होते. चर्चा रंगात असताना अचानक त्यांची छोटी मुलगी खोलीत शिरते, पाठोपाठ मुलगाही शिरतो आणि त्यानंतर जो गोंधळ माजतो तो बघण्यासारखा असतो. काही मिनिटांने एक महिला धावत येऊन या दोन्ही मुलांना अक्षरश: फरफटत नेते. ही दोन मिनिटांची व्हिडिओ क्लिप गेल्या दोन दिवसांत तूफान व्हायरल झाली होती.

त्यानंतर बीबीसीने केलींची एक छोटीशी मुलाखत घेतली. बरं या मुलाखतीत यावेळी केली सहकुटुंबासहित स्काईप चॅटवर आले होते आणि मुलांना फरफटत नेणारी ती महिलाही त्यांच्या शेजारी बसली होती. अनेकांना ती महिला केलींच्या मुलांना सांभाळणारी मोलकरीण वाटली होती पण ती मोलकरीण नसून केलींची पत्नी जाँग किम होती. एका गोंधळानंतर सोशल मीडियावर स्टार झालेल्या केलींना आपला व्हायरल झालेला व्हिडिओ पाहून कसे वाटले असा प्रश्न अँकरने विचारला. तेव्हा या गोंधळानंतर बीबीसी यापुढे कधीच आपल्याला चर्चसाठी बोलावणार नाही अशी भिती वाटली असल्याचे केलींनी पहिल्यांदा कबुल केले. हा कार्यक्रम संपल्यानंतर व्हिडिओ क्लिप पाहून मी आणि माझी पत्नी पोट दुखेपर्यंत हसलो आता यानंतर बीबीसीचे दार कायमचे बंद झाले असेही आपल्याला वाटले असल्याचे त्यांनी बोलून दाखवले. तर दुसरीकडे आपल्यावर मात्र ‘नॅनी’ किंवा मुलांना सांभळणारी मोलकरीण असा ठपका ठेवला होता तेव्हा थोडं वाईट वाटलं, आपल्यावर अनेक विनोदही झाले पण मी त्यांची पत्नी आहे हे आता कदाचित लोकांना लक्षात आले असेल तेव्हा ते विनोद करणं थांबवतील अशीही प्रतिक्रिया त्यांच्या बायकोने दिली.  पण या मुलाखती दरम्यान केलींची मुलं मॅरिअन आणि जेम्स मात्र आधी जो गोंधळ घालत होते तसाच गोंधळ घालण्यात दंग होते. गेल्या आठवड्यात लाइव्ह कार्यक्रमात उडालेला हा गोंधळ बीबीसीचा अँकर आणि केली या आपलं हसू दाबत शांतपणे हँडल केला होता.

Story img Loader