मौल्यवान हिरे हे त्याची चमक आणि महागड्या किंमतींसाठी ओळखले जातात. अनेकांसाठी हिरे एक आकर्षणाचा विषय असतात. यामुळे अनेक सेलिब्रिटी, उद्योगपती आपल्या स्पेशल व्यक्तींना भेटवस्तू म्हणून हिऱ्यांची ज्वेलरी देतात. पण या हिऱ्यांमध्ये तुम्ही कधी ह्रदयासाराखा धडधडणारा हिरा ऐकला आहे का? आज आम्ही अशाच एका हिऱ्याबद्दल सांगणार आहोत. जो अतिशय दुर्मिळ आहे, या दुर्मिळ हिऱ्याची खास गोष्ट म्हणजे या हिऱ्याच्या आत आणखी एक हिरा आहे. ज्यामुळे तो हृदयाप्रमाणे धडधडल्यासारखा दिसत असल्याचा वाटतोय. याच कारणामुळे हिरा शोधणाऱ्या डायमंड सिटी हिरे निर्मात्यांनी त्याला ‘बीटिंग हार्ट डायमंड’ असे नाव दिले आहे.
गुजरातमधील डायमंड सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुरतमध्ये हा हिरा सापडला आहे. ज्या ज्वेलरने हा हिरा पहिल्यांदा पाहिला त्याला देखील आपल्या डोळ्यांवर विश्वास बसेना. हिऱ्याचा हा दुर्मिळ प्रकार भारतात पहिल्यांदाच पाहायला मिळाला आहे. हा हिरा आता ब्रिटनला पाठवण्यात आला आहे.
हा हिरा ०.३२९ कॅरेटचा डी रंगाचा असून ज्याचा शोध व्हीडी ग्लोबलने ऑक्टोबर २०२२ मध्ये लावला होता. पण भारतात या दुर्मिळ हिऱ्याचा शोध लावल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. ज्वेलरने या दुर्मिळ हिऱ्याचे निरीक्षण केले तेव्हा त्या हिऱ्याच्या आत आणखी एक हिरा असल्याचे दिसले. जो आतमध्ये मुक्तपणे फिरत होता. यामुळे या हिऱ्याला बीटिंग हार्ट डायमंड असे नाव देण्यात आले.
यावर व्हीडी ग्लोबलचे अध्यक्ष वल्लभ वघासिया यांनी सांगितले की, हा दुर्मिळ हिरा पाहिल्यानंतर तो आम्हाला अगदी धडधडणाऱ्या ह्रदयाप्रमाणे वाटला म्हणून आम्ही त्याला बीटिंग हार्ट असे नाव दिले.