मानव हा प्राण्यांमध्ये सर्वात बुद्धिमान जीव आहे असे म्हटले जाते. मात्र, निसर्गाच्या सानिध्यात राहणाऱ्या प्राण्यांकडे, पक्षांकडे पाहून खरंतर ते जीव आपल्यापेक्षा कितीतरी पटीने हुशार आणि अत्यंत बुद्धिमान आहेत असे आपल्याला जाणवते. मात्र, जागतिक वन्यजीव दिवस तर होऊन गेला, परंतु आता हे सगळं कशासाठी असे तुम्हाला वाटत असेल; तर त्याचे कारण म्हणजे सोशल मीडियावर शेअर झालेला पोपटाचा एक अत्यंत सुंदर व्हिडीओ.
सोशल मीडियावर अनेकदा कुत्रा, मांजर अशा पाळीव प्राण्यांचे, तसेच जंगली प्राण्यांचे व्हिडीओ शेअर केले जातात. यामध्ये काही वेळा प्राणी ज्या हुशारीने एखादी कृती करतात, ते पाहून आपल्याला अगदी आश्चर्य वाटते. तसेच शहाळ्याचे पाणी पिणाऱ्या एका पोपटाचा व्हिडीओ शेअर झाला आहे. ‘पोपट शहाळ्याचे पाणी पीत आहे’, यात काय विशेष? यामध्ये विशेष असे की, तो पोपट कुणाच्याही मदतीशिवाय स्वतः शहाळे फोडून पाणी पित असल्याचे व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसते. नेमका तो पोपट काय करतोय ते पाहू.
हेही वाचा : World Wildlife Day 2024 : भारतातील धोक्यात असलेले पाच वन्यप्राणी कोणते? घ्या जाणून….
इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर nomadicwaters नावाच्या अकाउंटने हा सुंदर व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये सुरुवातीला पिवळ्या रंगाचे शरीर आणि निळ्या रंगाचे पंख असलेल्या पोपटाचे दर्शन होते. हा पोपट नारळाच्या झाडावर बसलेला आहे. आता हा पोपट चोचीच्या मदतीने, झाडाला लागलेल्या एक लहानशा आकाराचे शहाळे तोडून घेतो. आता त्याच्या मजबूत आणि बाकदार चोचीच्या खालच्या भागाने नारळाचा वरचा, थोडासा मऊसर भाग एक-दोन वेळेस खरवडतो.
असे केल्याने त्या नारळात आपसूक छोटासा खड्डा तयार झाला. आता तोच नारळ वरच्या चोचीत धरून, आपली मान वर करून त्यामध्ये असलेले पाणी पिऊन घेतो. नंतर आपण हाताने जसा ग्लास धरतो, अगदी तसाच त्या पोपटाने पायाच्या मदतीने ते शहाळे काही सेकंदांसाठी धरून ठेवले. मग पुन्हा त्यामध्ये उरलेले पाणी पिण्यासाठी पोपटी चोचीचा वरचा भाग नारळामध्ये खुपसून पाणी संपवतो. असे या काही सेकंदांच्या व्हिडीओमध्ये आपल्याला पाहायला मिळते.
या भन्नाट आणि चकित करणाऱ्या व्हिडीओवर नेटकरी काय म्हणतात ते पाहू.
“इतक्या लहानश्या शहाळ्यामध्ये केवढे पाणी आहे!” असे एकाने लिहिले आहे. “वाह! पोपटानेदेखील पाणी पिण्यासाठी शहाळ्याचा उपयोग केला, ही खरंच निसर्गाची किमया आहे”, असे दुसरा म्हणत आहे. “देवाने सर्व प्राण्यांना सामान बुद्धिमत्ता दिली आहे. खरंच खूपच सुंदर व्हिडीओ आहे”, असे कौतुक तिसऱ्याने केले आहे. चौथ्याला, “ते शहाळं लहान आकाराचं आहे की, तो पोपट खूप मोठा आहे?” असा प्रश्न पडला आहे. तर शेवटी पाचव्याने, “वाह, नारळ फोडण्याची यंत्रणा आणि ते पाणी पिण्यासाठी केलेली योजना.. खूपच सुंदर.. भन्नाट!” असे लिहिले आहे.
हा व्हिडीओ इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर @nomadicwaters नावाच्या अकाउंटवरून शेअर झाला आहे. तसेच या व्हिडीओला आत्तापर्यंत ४.८ मिलियन इतके व्ह्यूज मिळाले आहेत.