आई आणि मुलाचं नातं कसं असतं खरंतर हे नव्याने सांगण्याची गरज नसते. आपल्या लेकाला जीवापाड जपणारी माऊली, त्याला कुठलीही इजा होऊ नये, दु:ख होऊ नये यासाठी कायम धडपडत असते, काळजी घेत असते. हे आपणास वारंवार आणि सर्वत्र दिसून येतं. मात्र, आपल्या आईच्या डोळ्यातील अश्रू थांबवण्यासाठी आणि तिच्या डोळ्यात अश्रू येऊ नये म्हणून इयत्ता सातवीमधील ओंकार शिंदे या गुणी विद्यार्थ्याने त्याच्या बुद्धी कौशल्याच्या बळावर एक अनोखा प्रयोग करून, आईचे अश्रू पुसण्याचाच एकप्रकारे प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. या गोष्टीला आता एक वर्ष होत असलं तरी अभिमनाची गोष्ट म्हणजे या चिमुकल्याला आता राष्ट्रपती भवनमध्ये सादरीकरण करण्याची संधी मिळाली आहे.

केंद्र सरकारनं फेस्टिवल ऑफ इनोवेशन अँड इन्टरप्रेनरशीपसाठी निवडलेल्या ६० विद्यार्थ्यांमध्ये ओमकार आणि त्याच्या शिक्षकांची निवड झाली आहे. चार दिवसात या फेस्टिवलचं उद्घाटन होणार असून स्वत: राष्ट्रपती या ठिकाणी हजेरी लावणार आहेत. या फेस्टीवलमध्ये विद्यार्थ्यांनी केलेले वेगवेगळ्या प्रकल्पांचं सादरीकरणही होणार आहे. कांदा चिरताना आपल्या आईच्या डोळ्यातून येणारे पाणी पाहावले नाही म्हणून, बीड येथे इयत्ता सातवीत शिकणाऱ्या ओमकार शिंदे या विद्यार्थ्यांने आपल्या कल्पक बुद्धीने स्मार्ट चाकूची निर्मिती केली. या स्मार्ट चाकूमुळे कांदा चिरताना डोळ्यात पाणी येत नाही.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

राष्ट्रपती भवनात सादरीकरणाची संधी –

हा प्रयोग प्रायोगिक तत्त्वावर यशस्वी ठरला. त्यानंतर शाळेतील शिक्षक भाऊसाहेब राणे यांनी या स्मार्ट चाकूचे पेटंट रजिस्टर केले. आता नवी दिल्ली येथे राष्ट्रपती भवनमध्ये आयोजित फेस्टिव्हल ऑफ इनोव्हेशन अॅण्ड इंटरप्रीनरशिपमध्ये या प्रयोगाची निवड झाली आहे. नवोपक्रम आणि उद्योजकता उत्सव अंतर्गत ओंकार स्मार्ट चाकू प्रयोगाचे सादरीकरण करणार आहे. या फेस्टिव्हलसाठी ओंकारसह शिक्षक भाऊसाहेब राणे यांची बीड जिल्ह्यातून निवड झाली आहे. भारत सरकारचा विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग आणि अहमदाबाद येथील राष्ट्रीय नवप्रवर्तन प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने या फेस्टिव्हलचे आयोजन केले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते फेस्टिव्हलचे उद्घाटन होणार आहे.

प्रयोग करण्याची प्रेरणा शिक्षकाकडून मिळाली –

ओमकारला असे नवनवे प्रयोग करण्याची प्रेरणा त्याच्या शिक्षकाकडून मिळाली. शाळेतील शिक्षक भाऊसाहेब राणे त्यांच्या शाळेतील विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव मिळण्यासाठी नेहमीच अग्रेसर असतात. यापूर्वी देखील त्यांनी विद्यार्थ्यांकडून असे प्रयोग करून घेतले होते. मात्र ओमकारच्या या प्रयोगामुळे त्यांची देखील चर्चा होऊ लागली आहे.

या चाकूने कितीही कांदा कापला तरी डोळ्याला पाणी येणार नाही –

“हा स्मार्ट चाकू बनवण्यासाठी मला दोन दिवस लागले. या चाकूचा वापर स्वयंपाकघरात विशेषकरून कांदा कापता होतो, तो कुठेही सहज नेता येतो. याने कितीही कांदा कापला तरी डोळ्याला पाणी येणार नाही. कांदा कापल्यानंतर जो वायू बाहेर पडतो, त्यामुळे आपल्या डोळ्यात पाणी येत असते. मात्र या चाकूला समोर एक विशिष्टप्रकारे छोटा पंखा बसवला असल्याने हा वायू थेट आपल्या डोळ्यात जात नाही आणि डोळ्यात पाणी येत नाही.” असं ओमकार शिंदे याने सांगितलं आहे.

आईच्या त्या उत्तराने मला रहावलं नाही – ओमकार शिंदे

तसेच, “ एकेदिवशी मी शाळेतून घरी आलो तेव्हा आई कांदा कापत होती. तेव्हा तिच्या डोळ्यात पाणी पाहून मी आईला तू का रडतेस असं विचारलं. तेव्हा आईने कांदा कापताना प्रत्येकाच्याच डोळ्यात पाणी येतं असं मला सांगितलं. आईच्या या उत्तराने मला रहावलं नाही, मी याबाबत माझे शिक्षक राणे यांना विचारलं. तेव्हा त्यांनी माला या मागचे वैज्ञानिक कारण सांगितलं. त्यावर मला एक कल्पना सूचली त्यानंतर मी कामाला लागलो आणि मला या प्रयोगासाठी सात दिवस लागले. यासाठी मला ड्रोन मोटर, फायबर पाईप, पंखा, वायर, बॅटरी, प्रेस बटण, चार्जर पीन इत्यादी साहित्य लागलं. मला हे संगळं पाहून बरं वाटतं. ” अशी माहिती ओमकारने दिली आहे.

आई-वडील हे दोघेही शेतमजुरी करून कुटुंब चालवतात –

बीड तालुक्यातील कुर्ला इथल्या जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत विज्ञानाचे धडे गिरणारा हा विद्यार्थी आहे. या ओमकारची चर्चा सध्या पंचक्रोशीत होऊ लागली आहे. ओमकार शिंदे यांचे आई-वडील हे दोघेही शेतमजुरी करून कुटुंब चालवतात. आपल्याला शिकता आलं नाही म्हणून, हे दोघेही जण दिवसरात्रं शेतात राबून ओमकारचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटत आहेत. अखेर मुलाची पंचक्रोशीत होणारी चर्चा पाहून त्यांचा उर अभिमानाने भरून आला आहे.

Story img Loader