Man Questioned Tax Policy On XUV Purchase: भारतातील करआकारणीच्या पद्धतीवर वारंवार अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कारण- भारतात स्वयंपाकघरातील मीठ, औषधांपासून ते कार खरेदीपर्यंत सर्वच गोष्टींवर सरकारकडून कर वसूल केला जात आहे. त्यामुळे विरोधी पक्षातील नेत्यांपासून ते सर्वसामान्य नागरिकांकडून भारतातील करआकारणीच्या पद्धतीला विरोध होताना दिसतोय. अशात सोशल मीडियावरही लोक भारतातील या कर पद्धतीवर मीम्स व्हिडीओ बनवून आपल्या अडचणी मांडताना दिसतात. कारण या कर पद्धतीममध्ये सर्वसामान्य माणूस भरडला जातोय. अशात सोशल मीडियावर अशाच एका व्यक्तीने नवीन कार खरेदीच्या बिलातील आकारलेल्या कराची रक्कम पाहून तीव्र संताप व्यक्त केला आहे.
या व्यक्तीने नुकतीच SUV700 ही नवीकोरी कार खरेदी केली, या कारच्या बिलावर कराची रक्कम जवळपास ४८ टक्के होती. ती रक्कम पाहून तो चांगलाच भडकला आणि त्याने थेट केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना एक ट्विट टॅग करून, काही प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यानंतर अनेक युजर्सनीदेखील कमेंट सेक्शनमध्ये भारतातील करआकारणी मुद्द्यावर हल्लाबोल केला आहे.
१४ लाखांची कार टॅक्स रक्कम पकडून गेली २१ लाखांवर
कार खरेदी करणाऱ्या व्यक्तीने त्याच्या XUV700 कारच्या बिलाचा फोटो पोस्ट केला आहे. त्यामध्ये XUV700 डिझेल कारची मूळ किंमत १४ लाख ५८ हजार ७८३ रुपये असल्याचे दिसतेय. मात्र, त्यानंतर राज्य सरकारकडून त्या कारवर दोन लाख चार हजार २२९ रुपये म्हणजे १४ टक्के एसजीएसटी आकारण्यात येतो. मग केंद्र सरकार त्यावर तेवढाच सीजीएसटी आकरते. त्याशिवाय या कारवर दोन लाख ९१ हजार ७५६ म्हणजे २० टक्के जीएसटी आकारला जात आहे.
त्यामुळे १४ लाख ५९ हजार रुपयांच्या कारसाठी त्या व्यक्तीला कराची रक्कम पकडून जवळपास तब्बल २१ लाख ५९ हजार रुपये द्यावे लागले आहेत. त्याच्या कारच्या या बिलाची पावती आता सोशल मीडियावर व्हायरल होतेय, ज्यावर त्या व्यक्तीने अर्थमंत्र्यांना काही प्रश्न विचारले आहेत.
कारचे बिल पोस्ट करीत त्याने लिहिले की, हे काय आहे, @FinMinIndia? दिवसाढवळ्या सुरू असलेल्या या लूटमारीला काही मर्यादा आहेत की नाही? तुमची अकार्यक्षमता भारताला मागे खेचत आहे. हा पूर्णपणे लाजिरवाणा प्रकार आहे.
दरम्यान, कारच्या बिलावरील कराची रक्कम पाहून अनेक युजर्सदेखील प्रश्न उपस्थित करीत आहेत. एका युजरने अर्थमंत्र्यांना ट्विट टॅग करीत लिहिले की, जी व्यक्ती आयकर भरते. अशा लोकांना कार, गॅझेट्स, घरगुती वस्तूंच्या खरेदी करताना कमी किमतीत या गोष्टी खरेदी करण्याची तरतूद असावी.
दुसऱ्या एका युजरने म्हटले की, ही मेड इन इंडिया कार आहे. कल्पना करा की, आपण CBU आणि CKD वर किती कर भरतो? एक सामान्य BMW, Audi किंवा Mercedes, ज्याची किंमत युरोप किंवा अमेरिकेत २० लाख रुपये आहे, त्या कारसाठी भारतात सुमारे ६५ लाख रुपये आहे. आणखी एका युजरने म्हटले की, या देशात फक्त गरीब लोकच सुखी आहेत.