मंदिराबाहेर भीक मागणा-या भिका-याने आतापर्यंत जमवलेल्या सा-या पैश्यांतून कोडानंदा रामालायम मंदिरासाठी चांदीचा मुकुट बनवून घेतला आहे. त्यामुळे विजयवाडामध्ये या दिलदार यदिरेड्डी यांची चर्चा आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून ते या मंदिराबाहेर भीक मागून आपला उदरनिर्वाह करत आहेत.
वाचा : तुरुंगातील फ्रेंच कैद्याने पत्नीसाठी बनवला ताजमहाल
मुत्यालमपादममधल्या कोडानंदा रामालायम मंदिराबाहेर भीक मागणा-या यदिरेड्डी या ७५ वर्षीय वृद्ध भिका-याने आतापर्यंत मिळाल्या पैशांतून रामला चांदीचा मुकूट चढवला आहे. पण ही काही पहिलीच वेळ नाही याआधी देखील त्यांनी साईबाबांच्या चरणी चांदीचा मुकुट अर्पण केला होता. या मंदिरातील गौतम रेड्डी यांनी ‘आजतक’ला दिलेल्या माहितीनुसार यदिरेड्डीयांनी दान केलेल्या मुकुटाची किंमत ही अडीच लाखांच्या आसपास आहे. यदिरेड्डी यांना कुटुंब नाही. काही वर्षांपूर्वी ते उदरनिर्वाहासाठी या परिसरात रिक्षा चालवायचे. पण वयामुळे त्यांना रिक्षा चालवणे शक्य नव्हते. म्हणूनच या मंदिराबाहेर भीक मागून ते उदरनिर्वाह करू लागले. गेल्या अनेक वर्षांपासून ते या मंदिराबाहेर भीक मागत आहेत. त्यातून त्यांना जे काही पैसे मिळतात ती सारी रक्कम ते या मंदिराला दान करतात. यापूर्वी त्यांनी २० हजार रुपये दिले होते. या मंदिरात येणा-या भाविकांसाना भोजन दिले जाते , त्यासाठी त्यांनी ही देणगी दिली होती.