सामान्यपणे साप चावल्यानंतर अनेकजण घाबरतात आणि त्यांना काय करु, कसं करु असं होतं. अनेकांना तर साप पाहताच अंगावर काटा येतो. मात्र बिहारमधील बेगुसरायमधील रुग्णालयामधील लोकांना एका तरुणाने सापासोबत केलेला प्रकार पाहून धक्काच बसलाय. एक तरुण या रुग्णालयामध्ये ४ फूट लांब साप घेऊन उपचारासाठी आला होता. मुंगेरी गंज येथील रहिवाशी असणारा गोपी पासवान असं या तरुणाचं नाव आहे. गाछी टोला येथे एका दुकानाच्या मागच्या बाजूला झाडांमध्ये शौचासाठी गेलेला असताना गोपीला साप चावला. साप चावल्यानंतर गोपीने त्या सापाला पकडून बाहेर आणलं आणि रस्त्यावर येऊन सापाला धडा शिकवण्यासाठी बदला घेण्याच्या हेतूने चिमट्याने त्याचे दातच खेचून बाहेर काढले.

हा सारा प्रकार घडत होता तेव्हा अनेकजण येथे जमा झाले होते. या सापाला घेऊनच गोपी रुग्णालयामध्ये उपचार करण्यासाठी पोहचला. डॉक्टरांनी या तरुणावर उपचार केले असून तो सुरक्षित असल्याचं सांगण्यात आलं आहे. मात्र उपचार झाल्यानंतरही हा तरुण या सापाशी खेळत होता. रुग्णालयातील वेटींग एरियामधील खुर्चीवर बसून तो सापाशी खेळत होता. कधी तो साप आपल्या चेहऱ्यावर ठेवत होता तर कधी तो सापाला दाताने चावत होता. हा सर्व प्रकार पाहून बघ्यांनी रुग्णालयामध्येही गर्दी केली.

साप चावल्यानंतर हा साप विषारी आहे की नाही हे ठाऊक नसल्याने हा तरुण साप घेऊनच रुग्णालयात पोहचला. त्यानंतर डॉक्टरांनाही त्याने तो साप दाखवला. हा साप विषारी नसल्याने या तरुणाच्या जीवाला धोका नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. मात्र आपल्याला चावलेल्या सापाला हा तरुण ज्या पद्धतीने हाताळत होता ते पाहून डॉक्टरांनाही आश्चर्य वाटलं. पुढे गोपीने या सापासोबत काय केलं यासंदर्भातील माहिती अद्याप समोर आलेली नाही.

Story img Loader