प्राण्यांच्या तस्करीच्या अनेक धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. दार्जिलींगमध्येही अशाच प्रकारची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मांडूळ सापाची अवैधरित्या विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या चार जणांना अटक करण्यात आली आहे. दार्जिलींगच्या वनविभागाकडून रेड सॅंड बोआ म्हणजेच मांडूळ साप जप्त करण्यात आला आहे. या सापाची तस्करी करणाऱ्या चार जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. अरिंदम सरकार, पासंग लामा शेरपा, अबवार मिया आणि जगदीश रॉय अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, बेलाकोबा वनविभागाच्या पथकाने दार्जिलींगच्या जंगलात सापळा रचून मांडूळ सापाची तस्करी करणाऱ्या चार जणांना अटक केलीय. अरिंदम सरकार, पासंग लामा शेरपा, अबवार मिया आणि जगदीश रॉय अशी आरोपींची नावे आहेत. नेपाळमध्ये या सापाची विक्री करण्याच्या या आरोपींचा प्लॅन होता. मांडूळ सापाला डबल इंजिन असंही म्हटलं जातं. कारण त्याचं डोकं आणि शेपटी सारखीच असल्याने सापाचा तोंड शोधण्यात अनेकांचा गोंधळ उडतो. मांडूळ साप भारत, इरान आणि पाकिस्तानमध्ये आढळतो. इंडियन सॅंड बोआ, जॉन्स सॅंड बोआ, रेड सॅंड बोआ आणि ब्राऊन सॅंड बोआ, अशा सापांच्या जाती आहेत.
सापांची अवैधपणे विक्री करण्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे बेकायदेशीरपणे सापांची तस्करी करणाऱ्यांवर वनविभागाकडून कारवाई केली जाते. सापांचे विष अवैधपणे बाजारात विकले जात असल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. प्राण्यांची विक्री करणाऱ्या टोळ्यांचा वनविभागाने अनेक वेळा पर्दाफाश केला आहे. प्राण्यांना जगण्याचे स्वातंत्र आहे, त्यांना जंगलात फिरताना माणसांकडून कोणतीही इजा होऊ नये, यासाठी वनविभागाकडून नेहमीच सूचना दिल्या जातात आणि जंगलातील नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईही केली जाते.