पूर्वी ट्रक किंवा मालवाहू जड वाहनांच्या मागे लिहिलेला संदेश अनेकांचे लक्ष खेचून घेत असे. अनेकदा सुविचारांसह सामाजिक जागृती करण्याचे काम या संदेशातून केले जात असे. हा ट्रेंड हळूहळू चारचाकी वाहनांपर्यंत आला. मात्र काही वाहनधारकांनी चांगले संदेश देण्याऐवजी आपले बुरसटलेले विचार लिहिण्यास सुरुवात केली. काही लोक आपल्या जातीची अस्मिता दाखविणारा संदेश लिहितात. तर काही जण स्वतःला सरकार, दादा, बॉस असल्याचे लिहितात. वाहतूक नियमांनुसार गाडीच्या मागच्या काचेवर आक्षेपार्ह असा संदेश लिहिणे अवैध आहे. अनेकदा वाहतूक विभागाकडून असा संदेशांकडे कानाडोळा करण्यात येतो. मात्र कोलकाता येथे एका वाहनचालकाने हद्दच केली. त्याने लिहिलेला संदेश इंटरनेटवर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला.

प्रकरण काय आहे?

कोलकाता पोलिसांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवर एका घटनेचा उल्लेख केला आहे. तसेच ज्या घटनेबद्दल लिहिले त्याचे फोटोही शेअर केले आहेत. आपल्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, बाजूला असलेल्या वाहनावर लिहिलेला संदेश तुम्ही वाचू शकता. कर्तव्यावर असलेल्या आमच्या एका पोलीस कर्मचाऱ्याने सदर वाहनाला पाहिले. ‘सापावर विश्वास ठेवा पण मुलीवर नको’, असे गमतीने लिहिले गेले असले तरी यातून महिलांचा अवमान होत आहे. हे प्रकरण आयपीसी कायद्याच्या कलम ४९९ आणि भारतीय न्याय संहितेच्या कलम ३६५ (आय) अंतर्गत येत आहे.

हे वाचा >> पुण्यातील ‘तिच्या’ पहिल्याच ऑफिस मिटींगमध्ये काय घडलं? तरुणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

पोलिस गुन्हा दाखल करणारच होते, पण…

याच पोस्टमध्ये कोलकाता पोलिसांनी पुढे सांगितले की, या प्रकरणी आम्ही कायदेशीर कारवाई करणार होतो. पण गुन्हा दाखल करण्यापूर्वी एकदा वाहन चालकाशी चर्चा करावी, त्याने कोणता गुन्हा केला. याची त्याला कल्पना द्यावी, असा विचार केला. कारण त्याने लिहिलेला संदेश हा महिलाविरोधी तर आहेच, पण त्याच्या स्वतःच्या घरातील महिलांचाही यातून अवमान होत आहे.

आणखी वाचा >> शेवटचं लॉग ऑफ… वहीवर नोट लिहिली अन् १६ वर्षीय मुलाची १४ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या; नक्की काय घडलं?

पोलिसांनी वाहनचालकाची काढली समजूत

पोलिसांनी वाहनचालकाला ताब्यात घेऊन त्याची समजूत काढली. त्याने लिहिलेला संदेश समस्त महिला वर्गाचा अपमान करणारा असल्याचे सांगितले. त्यानंतर वाहनचालकानेही आपली चूक सुधारात गाडीच्या मागच्या काचेवर लावलेला संदेश काढून टाकला. कोलकाता पोलिसांनी ही बातमी आता सोशल मीडियाद्वारे सर्वांशी शेअर केली आहे.

Live Updates
Story img Loader