हल्ली अनेक हॉटेल्समध्ये पुदिन्याची जुडी घातलेले पाणी पिण्यासाठी दिले जाते. पदार्थाची चव वाढवण्याबरोबरच तो पदार्थ सकस व आरोग्यपूर्ण बनवण्याचे काम पुदिना करतो. पचनक्रिया वाढवण्यासाठी त्याचप्रमाणे सर्दी, मळमळ, पोटदुखी यांसारख्या अनेक समस्यांवर पुदिना उपयोगी ठरतो. पुदिन्याचे असे अनेक फायदे आहेत. पण उन्हाळ्यात पुदिन्याची जुडी घातलेले पाणी पिणेही फायदेशीर ठरू शकते. पुदिन्याचा वास जरी उग्र असला तरी हाच वास तुम्हाला घटक्यात ताजे टवटवीत देखील बनवून शकतो. पाण्यात काही काळ पुदिना ठेवल्याने पाण्यात पुदिनाची चव आणि गंध उतरतो. या पाण्याचे सेवन केल्यानंतर ताजे वाटते. उन्हाळ्यात पुदिन्याचा मोठा प्रमाणात वापर केला जातो. उन्हातून आल्यावर पुदिन्याची जुडी ठेवलेले गारगार पाणी प्यायल्याने मरगळ कुठच्या कुठे पळते आणि ताजे वाटते. म्हणून अनेक ठिकाणी पुदिन्याचे पाणी दिले जाते.
वाचा : धूम्रपान सोडल्यास आयुष्यमानात वाढ
कसे बनवाल पुदिन्याचे पाणी ?
पुदिन्याची अर्धी जुडी साफ करून स्वच्छ धुवून घ्या. एका जगमध्ये तळाला पुदिन्याची जुडी ठेवा. त्यावर दोन लीटर पाणी वरून ओता. हे पाणी रात्रभर फ्रिजमध्ये ठेवून नंतर त्याचा पिण्यासाठी वापर करण्यात येतो. पुदिन्याचा गंध आणि चव तोपर्यंत या पाण्यात उतरते. पाणी देताना मात्र पुदिन्याच्या जुड्या बाजूला काढून ठेवा.
वाचा : ग्रीन टी बनवताना ‘या’ चुका करू नका
पुदिन्याचे फायदे
* पुदिन्याच्या तेलातील मेंथॉल आणि मेंथाईल अॅसिटेट यांमुळे पुदिन्याला तीव्र वास येतो. च्युईंगम, टूथपेस्ट, औषधे, गुळण्या करण्यासाठी असणारी द्रावणे, इत्यादींमध्ये स्वादासाठी मेंथॉलचा उपयोग केला जातो. मेंथॉलमुळे त्वचेतील थंड तापमानाची जाणीव करून देणाऱ्या चेतापेशी उद्दीपित होतात आणि मेंदूकडे संवेदना पाठवतात. म्हणूनच पुदिना तेलाचा स्पर्श त्वचेला होताच तेथे थंडावा जाणवतो.
* पुदिन्यातील मेंथॉल वापरून काही औषधे तयार केली जातात. फार पूर्वीपासून पोटदुखीवर औषध म्हणून पुदिना वापरला जात आहे. पुदिन्यामुळे पोटाचे मृदू स्नायू शिथिल होतात; त्यामुळे पोटात मुरडा येत नाही. मेंथॉलमुळे पोटाला आराम तर मिळतोच, पण सूक्ष्म जिवांचीही वाढ होत नाही. याशिवाय डोकं दुखलं, की पुदिन्याचं तेल कपाळावर चोळतात. सर्दी झाली की श्वास घ्यायला त्रास होतो, त्या वेळी श्वसन करणं सुलभ व्हावं म्हणून पेपरिमट तेल नाकावर, गळ्यावर चोळतात.
* तोंडाची दुर्गंधी घालवण्यासाठी, टूथपेस्टमध्ये, माऊथवॉशमध्ये पेपरिमट तेल घातलेले असते. पुदिन्याचं तेल कीटकनाशक म्हणूनही वापरलं जातं.
(टीप : ही बातमी जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यामुळे त्यातील मतांशी ‘लोकसत्ता’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)