बंगळुरूमधील एक अनोखे प्रकरण समोर आले आहे, ज्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सुरु आहे. कारण येथील एका कचरा वेचणाऱ्याला व्यक्तीला एक बॅग सापडली होती, जी अमेरिकी चलनाच्या नोटांनी भरलेली होती. पिशवीतील डॉलर पाहून कचरा वेचणाऱ्या व्यक्ती आश्चर्याचकित झाला आणि त्याने या प्रकरणाची माहिती त्याच्या मालकाला दिली. त्यानंतर मालकाने अमेरिकन डॉलर सापडल्याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले.
मिळालेल्या माहितीनुसार, ३ नोव्हेंबर रोजी सुलेमान नावाचा व्यक्ती बंगळुरूमधील नागावरा रेल्वे स्टेशनवर प्लास्टिकच्या बाटल्या गोळा करत होता. या बाटल्या गोळा करत असताना त्याला एक बॅग सापडली. सुलेमानने ही बॅग उघडली तेव्हा त्याला त्यामध्ये अमेरिकन चलनाचे (डॉलर) २३ बंडल सापडले. हे बंडल तो घरी घेऊन गेला. दरम्यान, ५ नोव्हेंबरला त्याने डॉलर सापडल्याची माहिती मालकाला सांगितली आणि मालकाने पोलिसांना याबाबतची माहिती दिली. सुलेमान हा पश्चिम बंगालमधील नादिया जिल्ह्यातील रहिवासी असून तो बंगळुरू येथे काम करतो.
तपासानंतर समजलं की, या डॉलरची किंमत भारतीय रुपयांमध्ये जवळपास २५ कोटी रुपये इतकी आहे. तर एवढी मोठी रक्कम सापडल्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असता प्राथमिक तपासात या नोटांना केमिकल लावल्याचं आढळलं. त्यामुळे या नोटांची चौकशी आवश्यक असल्याचं पोलिसांनी सांगितलं. तर या नोटा बनावट असून, हा ‘ब्लॅक डॉलर स्कॅम’चा एक भाग असल्याचेही बोललं जात आहे. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणात बनावट अमेरिकन नोटा कुठून आणि कशा आल्या, याचा तपास पोलीस करत आहेत. बॅगेत अमेरिकन डॉलर्ससह संयुक्त राष्ट्राचा शिक्का असलेले लेटरहेड देखील सापडले आहे.
दरम्यान, सुलेमानला या नोटांच्या बंडल पाहून त्यांनी स्वराज इंडियाचे सामाजिक कार्यकर्ते कलीम उल्लाह यांना नोटांची माहिती दिली, त्यांनी बंगळुरूच्या आयुक्तांना संबंधित प्रकरणाची माहिती दिली. आयुक्तांनी दोघांनाही बॅग घेऊन आपल्या कार्यालयात बोलावले. तपासणी केली असता नोटांच्या बंडलमध्ये केमिकल असल्याचे आढळून आले. आता या नोटा कुठून आणि कशा आल्या याचा तपास सुरू केला आहे.