Air Force officer Assault Case Viral Video : बंगळुरू येथे एका भारतीय हवाई दलातील अधिकार्‍याला मारहाण झाल्याच्या घटनेला सीसीटीव्ही फुटेजमुळे एक नवीन वळण लागताना दिसत आहे. या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायजेशन (डिआरडीओ) अधिकारी देखील त्यांच्यावर हल्ला करणाऱ्या व्यक्तीला मारहाण करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ समोर आल्याने या घटनेत दोघांनी एकमेकांवर हल्ला केल्याचे दिसून येत आहे. दरम्यान या मारहाणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

दरम्यान समोर आलेल्या या व्हिडीओमध्ये विंग कमांडर आदित्य बोस आणि त्यांची पत्नी हिरव्या रंगाचे जॅकेट घातलेल्या व्यक्तीकडे जाताना दिसत आहेत. तसेच बोस यांनी मारहाणीला सुरूवात केल्याचे तसेच त्यांची पत्नी देखील वादात सहभागी होत असताना दिसून येत आहे.

तर दुसऱ्या एका व्हिडीओ फुटेजमध्ये बोस हे त्या व्यक्तीला रस्त्यावर ढकलून देताना तसेच लाथा मारताना दिसून येत आहेत. तसेच जमलेले लोक बोस यांना रोखण्याचा प्रयत्न करताना देखील या व्हिडीओ फुटेजमध्ये पाहायला मिळत आहेत.

नेमकं प्रकरण काय आहे?

सोशल मीडियावर अपलोड केलेल्या दोन वेगवेगळ्या व्हिडीओमध्ये विंग कमांडर आदित्य बोस यांनी ते विमानतळाकडे जात असताना स्थानिक नागरिकांनी त्यांच्यावर आणि पत्नी स्क्वॉड्रन लीडर मधुमिता यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप केला होता. दुचाकी चालकाने त्यांची कार थांबवली आणि कन्नड भाषेत शिव्या देण्यास सुरुवात केली असे बोस या व्हिडीओमध्ये म्हणाले होते.

दुचाकीस्वाराने कारवर लावलेले डीआरडीओचे स्टीकर पाहिल्यानंतर परिस्थिती चिघळली असे बोस म्हणाले होते. जेव्हा बोस कारमधून खाली उतरले तेव्हा दुचाकीस्वाराने त्यांच्या कपाळावर चावीने वार केले, ज्यामुळे रक्तस्त्राव झाला असेही बोस यांनी सांगितले. यावेळी इतरही काहीजण सहभागी झाले आणि एका व्यक्तीने त्यांना दगड मारला असा आरोपही बोस यांनी केला.

इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये बोस यांना डोक्याला जखम झाल्याचे दिसून येत आहे. तसेच त्यांचे डोके, मान आणि चेहऱ्यावर रक्त दिसत आहे. दरम्यान या व्हिडीओमध्ये बोस यांनी सांगितलं की, “एका दुचाकी मागून आली आणि आमची कार अडवली. त्यानंतर त्या व्यक्तीने मला कन्नडमध्ये शिवीगाळ सुरू केली. जेव्हा त्यांनी डीआरडीओ स्टीकर पाहिलं, ते म्हणाले ‘तुम्ही डिआरटीओवाले लोक’ आणि त्यांनी माझी पत्नीला शिवागाळ केली. मी कारमधून बाहेर पडताक्षणी दुचाकी चालकाने माझ्या कपाळावर चावीने वार केला आणि त्यामुळे रक्त येऊ लागले.”

बोस यांना कोलकात्याला जायचे असल्याने त्यांनी तक्रार दाखल केली नाही, पण नंतर मधुमिता यांनी बैयप्पनहल्ली पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. या प्रकरणात एफआयआर दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली. मधुमिता यांनी त्यांच्या तक्रारीमध्ये आरोप केला आहे की दुचाकी चालक हा बेदरकपणे गाडी चालवत होता. तसेच त्याने त्यांच्या कारला पाय आणि दगड मारला. मात्र नंतर समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये मात्र वेगळाच प्रकार समोर आला आहे. या फुटेजनुसास बोस यांनी वादाला सुरूवात केल्याचे दिसून येत आहे.

“सकाळी ६ वाजताच्या सुमारास एका दुचाकीस्वार आणि एका भारतीय हवाई दलाच्या अधिकाऱ्यामध्ये वाद झाला, जे डीआरडीओ क्वार्टरमधील त्याच्या घरापासून विमानतळाकडे जात होते… आम्ही सीसीटीव्ही फुटेज तपासले आहे आणि हे स्पष्ट आहे की दोन्ही बाजूंनी ही घटना टाळता आली असती. हे स्पष्टपणे रोड रेजचे प्रकरण आहे. आम्ही तक्रार दाखल केली आहे आणि दुचाकीस्वाराला अटक केली आहे,” असे डीसीपी पूर्व देवराज डी म्हणाले.