लाडक्या गणरायचं आगमन या आठवड्यात होणार आहे. तेव्हा ठिकठिकाणी गणरायाच्या आगमनाची लगबग सुरू आहे. फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशभरात गणेशोत्सव मोठ्या आनंदानं साजरा केला जातो. सध्या इको फ्रेंडली गणपती मुर्ती तयार करण्याकडे सगळ्यांचा कल वाढत आहे. पर्यावरणाचं कमीत कमी नुकसान व्हावं यासाठी सगळेच आपापल्या परीनं प्रयत्न करत आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी शाडूच्या मातीच्या किंवा नैसर्गिक पदार्थ वापरून गणेशाच्या मुर्ती साकारल्या जात आहे. महाराष्ट्रात अशी अनेक मंडळी आहेत जी भाज्या, फुले किंवा इतर पदार्थ वापरूनही गणपतीची मुर्ती साकारत आहे. बंगळुरूमधील एका गणेश मंदिरात अशीच एक आगळीवेगळी बाप्पांची मूर्ती साकारली जात आहे.

बंगळुरूमधील जेपी नगर येथील गणेश मंदिरात ऊसापासून भव्य अशी गणेशमुर्ती साकारली आहे. जवळपास ४ टन ऊस वापरून ३० फुटांची उंच मुर्ती साकारण्यात आली आहे. ३० कारागीर गेल्या २१ दिवसांपासून बाप्पांची उंचच उंच मुर्ती साकारण्यासाठी मेहनत घेत आहे. बाप्पाला चार हजार किलोंच्या लाडूंचाही नैवेद्य चढवण्यात येणार आहे. बाप्पांचीही ही आगळीवेगळी मुर्ती अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे. काही वर्षांपूर्वी चेन्नईतील कोलातूर भागात तब्बल ३ टन अननस आणि ऊस वापरून असे आगळेवेगळे बाप्पा साकारण्यात आले होते.