Water Crisis : भारतातील आयटी हब म्हणून ओळखल्या जाणारी कर्नाटकची राजधानी बेंगळुरु सध्या भीषण पाणीटंचाईचा सामना करीत आहे. सातत्याने वाढणारे तापमान आणि पाणीटंचाई यांमुळे तेथील नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय. शहरातील वाढत्या पाणीटंचाईचे संकट लक्षात घेता, तेथील प्रशासनाने कार धुणे, बागेतील झाडांना पाणी घालणे यांसह अनेक कामांवर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. इतकेच नाही, तर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचे आदेशही देण्यात आलेत. त्यावरून बेंगळुरूमधील पाणीटंचाईच्या भीषण स्थितीचा अंदाज येऊ शकतो.
अशात एका Reddit वापरकर्त्याने एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, बेंगळुरूमधील जलसंकटाची स्थिती इतकी गंभीर आहे की, रहिवाशांना मॉल्समधील शौचालये वापरण्यास भाग पाडले जात आहे.
पोस्टमध्ये म्हटले आहे की, शहरातील अनेक भाडेकरू घरे रिकामी करीत आहेत; तर काहींनी तात्पुरत्या निवासस्थानी स्थलांतर केले आहे. पॉश फ्लॅटमालक टॉयलेटसाठी मॉल्समध्ये जात आहे. एक काळ असा होता की, जेव्हा लोक बंगळुरूच्या मॉल्समध्ये स्टार्टअप कल्पनांवर चर्चा करीत होते आणि आता त्याच मॉल्सचा वापर लोक अंघोळ आणि शौचालयासाठी करीत आहेत. कारण- त्यांच्या १.५ कोटींच्या फ्लॅटमध्ये पाणी नाही.
दरम्यान, फेसबुक, ट्विटरसह इतर अनेक सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्मवरही बेंगळुरूमधील पाणीटंचाईच्या भीषण परिस्थितीवर प्रकाश टाकणाऱ्या पोस्ट व्हायरल होत आहेत. सद्यस्थितीत बेंगळुरूमधील रहिवाशांना त्यांच्या दैनंदिन कामांसाठी पाण्याच्या टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. या परिस्थितीचा गैरफायदा घेत, अनेक टँकर चालकांकडून अनेकदा जास्त पैसे आकारले जात आहेत.
महापालिकेच्या पाण्याच्या टँकरजवळ लागलेल्या लांबच लांब रांगा आणि महागड्या पाण्याच्या टँकरवर पाणी भरणारे लोक हे चित्र शहरातील अनेक भागांत रोज पाहायला मिळतेय. त्यात कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी नुकतेच राज्यातील १३६ तालुक्यांपैकी १२३ तालुके दुष्काळग्रस्त घोषित केले. त्यातील १०९ तालुके गंभीरपणे प्रभावित आहेत. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी ५ मार्च रोजी आश्वासन दिले की, सरकार कोणत्याही किमतीत बेंगळुरूमधील नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा उपलब्ध करून देईल.