नववर्षाच्या जल्लोषासाठी बंगळुरुमध्ये जमलेल्या महिलांसोबत विनयभंग झाल्याच्या घटनेने पुन्हा एकदा देशाची मान शरमेने खाली झुकली. बंगळुरूमधल्या अत्यंत उच्चभ्रु समजल्या जाणा-या भागात नववर्षांच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने तरुण तरूणी जमले होते. यावेळी येथे जमलेल्या अनेक महिलांचा विनयभंग करण्याच्या घटना घडल्या. दुर्दैव म्हणजे त्या ठिकाणी सुरक्षेसाठी दीड हजार पोलीस तैनात करण्यात आले होते. तरीही पोलिसांच्या डोळ्यादेखत महिलांना असा अत्याचार सहन करावा लागला. याचे काही सीसीटीव्ही फुटेजही व्हायरल झाले. पण आपली छेड काढू पाहणा-या तरुणाला मात्र एका तरुणीने चांगलाच धडा शिकवला. याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्यवसायाने छायाचित्रकार असलेली चैताली वासनिक या बंगळुरूमध्ये राहणा-या तरुणीला ३१ डिसेंबरच्या रात्री इतर महिलांसारखाच वाईट अनुभव आला. पण अन्याय सहन न करता तिने आपली छेड काढणा-या तरूणाला चांगलाच धडा शिकवला. आपले काम संपवून ती रात्री १ च्या सुमरास घरी परतत होती. तिला एकटे पाहून एका तरुणाने तिची छेड काढली. पण चैताली गप्प बसली नाही. तिने या तरुणाला बेदम चोप दिला. दारुच्या नशेत तिची छेड काढली असे कारण सांगून त्याने पुढे काढता पाय घेतला असता. पण अशा मुलांना मोकाट सोडेल ती चैताली कसली? तिने पोलीस आणि इतर लोकांच्या डोळ्यादेखत त्याला चोप दिला. शेवटी जीव वाचवून त्याने पळ काढला.
हफिंग्टन पोस्टला दिलेल्या मुलाखतीत तिने सांगितले. की नेहमीच तिला घरी यायला उशीर होतो. तेव्हा रस्त्यावर क्वचितच पोलीस असतात असे प्रसंग आले की पोलीस दुर्लक्ष करतात अशीही खंत तिने व्यक्त केली. बंगळुरुमध्ये ३१ डिसेंबरला महिलांचा विनयभंग करण्याच्या अनेक घटना घडल्या. त्यातून समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रमुख आमदार अबू आझमी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले. ‘माझी बहिण किंवा मुलगी रात्रीचे अनोळखी पुरुषासोबत बाहेर पडते आणि त्यावेळी तिच्यासोबत भाऊ किंवा पती नसेल. तर हे बरोबर नाही. पेट्रोल असेल तिथे आग भडकणारच आणि साखर असले, तिथे मुंग्या येणारच असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले होते.