प्रचंड ऊर्जा, उत्साह आणि उमेद देणारा नवरात्रीचा उत्सव म्हणजे हिंदुस्तानांपैकी महत्त्वाच्या सणांपैकी एक असला तरी देशभरात वेगवेगळ्या पद्धतीने दुर्गामातेची पूजा होते. प्रत्येकजण मनोभावे आपल्या पद्धतीने देवीची मनोभावे पूजा करतात. हा सण साजरा करण्याची पध्दत वेगवेगळी असली तर सगळीकडे दिसणारा उत्साह पाहण्यासारखा असतो. सोशल मीडियावर सध्या कर्नाटकमधल्या नवरात्रौत्सवाचा फोटो प्रचंड व्हायरल होतोय. एका महिलेने तिच्या घरी एक दोन नव्हे तर तब्बल दहा हजार बाहुल्यांनी घर सजवून पुजा केल्याचा फोटो व्हायरल होतोय. नवरात्र साजरा करण्याच्या अनोख्या पद्धतीने सर्वाचंच लक्ष वेधून घेतलंय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कर्नाटकच्या बंगळुरू इथल्या एका वृद्ध महिलेने यावर्षी जवळपास १०,००० बाहुल्यांनी आपलं घर सजवलंय. भाग्यलक्ष्मी असं या महिलेचे नाव असून ती बंगळूरच्या त्यागराज नगरची रहिवासी आहे. तिने स्वतःच्या घरात सजवलेल्या या बाहुल्या शतकापेक्षाही खूप जुन्या आहेत. वेगवेगळ्या पद्धतीच्या बाहुल्यांनी गजबजलेलं हे घर पाहून एका संग्रहालयात तर आलो नाही ना असा भास होताना दिसतो. आपण भुलाबाईभोवती मांडतो अगदी तशाच पद्धतीने या बाहुल्यांची सजावट करण्यात आल्याचं दिसून येतंय.

हा व्हायरल फोटो पाहून तुमच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. या फोटोमध्ये नक्की काय आहे? या बाहुल्या नक्की कशासाठी ठेवल्या आहेत? असे एक ना अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील.

नवरात्रीमध्ये बाहुल्यांनी घर सजवणे ही कर्नाटकातील वर्षभराची परंपरा आहे. याला कन्नडमध्ये बोंबे हब्बा, गोलू, कोलूवू किंवा फक्त दसरा बाहुली म्हणूनही ओळखलं जातं. नवरात्रीची सुरुवात होतात दक्षिण भारतात पांरपारिक बाहुल्या दिसू लागतात. या बाहुल्या 7,9, 11 असा ऑड नंबरनी लावल्या जातात. नवरात्रीमध्ये देवीची पूजा करताना वेगवेगळ्या प्रकारच्या छोट्या मोठ्या बाहुल्या मांडल्या जातात आणि त्याचीही पूजा केली जाते. देवीच्या रूपात या बाहुल्यांची आरास केली जाते.

बंगळूरच्या भाग्यलक्ष्मी या वृद्ध महिलेने या वर्षी ‘महाभारत’ या प्राचीन कथेची ही थीम ठेवली आहे. या त्यांनी द्रौपदी, मानभंगा, बाणांच्या पलंगावर झोपलेले भीष्मा, द्रौपदी ‘स्वयंवर’ इत्यादी महाभारतातील पात्रांशी संबंधित महत्त्वपूर्ण दृश्यांचे सादरीकरण केलंय. या बाहुल्याच्या सजावटीचे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. नवरात्र साजरी करण्याच्या अप्रतिम प्रथा पाहून अनेकांना या प्रथेबाबत जाणून घेण्याची उत्सुकता लागली आहे.

एएनआय वृत्तसंस्थाशी बोलताना भाग्यलक्ष्मी म्हणाल्या, “करोना परिस्थितीमुळे आम्ही गेल्या वर्षीच्या नवरात्रीत बाहुल्या ठेवू शकलो नाही. आम्हाला दोन वर्षांचा वेळ मिळाल्यामुळे आम्हाला सुमारे २५० वेगवेगळ्या बाहुल्या मिळाल्या आणि त्यांची केशरचना, ड्रेस, दागिने इत्यादींनी सजवणं शक्य झालं. आम्ही दरवर्षी थीम बदलतो. या वर्षी आम्ही ‘महाभारता’चे सादरीकरण करण्याचा प्रयत्न केला. यात महाभारतातील प्रमुख दृश्य उदाहरणार्थ फास्यांचा खेळ, द्रौपदी ‘मानभंगा’, भीष्मा बाणांच्या पलंगावर झोपलेले, द्रौपदी ‘स्वयंवर’ असं दृश्य निवडले.”

यापुढे अधिक माहिती देताना त्या म्हणाल्या, “आम्हाला विविध देशांमधून बाहुल्या मिळाल्या आहेत. यात १०० वर्ष जुन्या हेरिटेज बाहुल्या देखील आहेत. आमच्याकडे सुमारे ५० हजार बाहुल्या आहेत. यावेळी आम्ही सुमारे दहा हजार बाहुल्यांचे प्रदर्शन केलंय. गेल्या ६० वर्षांपासून परंपरा म्हणून आम्ही हे करत आलो आहोत. बाहुल्यांचा प्रत्येक संच नवीन कथा सांगत असतो.”