होम डिलिव्हरी सर्व्हिस प्रोव्हायडर कंपन्या खूप क्रिएटिव्ह कॅम्पेन चालवतात. हे कॅम्पेन काहीवेळा इतके भारी असतात की युजर्सनाही ते खूप आवडते. अनेकदा सोशल मीडियावर वेगवेगळ्या कंपन्यांच्या कॅम्पेनचे फोटो व्हायरल होतात. यात मागील काही दिवसांपासून स्विगी इंस्टामार्ट एक अनोखे कॅम्पेन राबवत आहे. अलीकडे बेंगळुरूमधील एका महिलेने स्विगी इंस्टामार्टवरून किराणा सामान ऑर्डर केले होते. यावेळी डिलिव्हरीमध्ये तिला कारलं आलं, जे पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
ऑर्डर केले पॉपकॉर्न, पण डिलिव्हरी आली कारल्याची
पौषाली साहू नावाच्या एका महिलेने स्विगी इंस्टामार्टवरून कॅरामल पॉपकॉर्नचे पॅकेट ऑर्डर केले होते, यावेळी डिलिव्हरी ॲपकडून कारलं आलं. विचित्र गोष्ट म्हणजे पौषालीने कारल्याची ऑर्डर दिली नसतानाही तिला कारलं पाठवण्यात आले, यासोबत कंपनीने एक लांबलचक नोट पाठवली आहे. ट्विटरवर तिने अनुभव शेअर करत लिहिले की, स्विगीने मला काल ऑर्डर केलेल्या कॅरामल पॉपकॉर्नच्या पॅकेटसह कारलं पाठवले. तसेच कंपनीने आतापर्यंतचे सर्वात विचित्र फ्रेंडशिप डे कॅम्पेन असल्याचेदेखील म्हटले आहे.
साहूच्या ट्विटमध्ये स्विगी इंस्टामार्टच्या नोटसोबत कारल्याचा फोटोही शेअर केला आहे. या नोटमध्ये एक कविता आणि लाइफसंदर्भात काही चांगल्या गोष्टी लिहिल्या आहेत. ज्यात असे लिहिले आहे की, कधीकधी आपण अशा लोकांना दूर ढकलतो, जे आपल्यावर सर्वात जास्त प्रेम करतात, अगदी कारल्यासारखे.
‘जीवनातील कडवेपणा साजरा करूया’
खरे मित्र तेच असतात जे आपल्याशी विनाकारण शुगरकोटिंग करण्याऐवजी खरे बोलतात. त्यांना आपलं चांगलं व्हावं असं वाटत असतं, पण कधी कधी ते कठोर आणि कडवट वागतात. कंपनीने म्हटले आहे की, “हा फ्रेंडशिप डे, चला आपल्या जीवनातील कडवटपणा साजरा करूया, कारण ते सर्वात चांगले मित्र आहेत.”
लोकांनी स्विगीच्या या कॅम्पेनला खूप पसंती दिली आणि महिलेच्या पोस्टवर भरपूर कमेंट केल्या. एका युजरने लिहिले की, हे एक चांगले कॅम्पेन आहे, तर दुसर्या युजरने लिहिले की, खरे मित्र हे कारल्यासारखे असतात.