लांबसडक केस हे तिच्या सौंदर्यात आणखी भर पाडत असतात ना? पण हेच केस कापण्याची दुर्दैवी वेळ जर का तिच्यावर आली तर ती का आली याचा विचार कधी आलाय का आपल्या डोक्यात? ‘तिने का केस कापले असतील?’ हा काही विचार करण्यासारखा प्रश्न नाही.
”आजकाल कोण ठेवतंय लांबसडक केस?’
” हल्ली तोकडे केस ठेवण्याची फॅशन आहे, तेव्हा कापले असतील तिने केस? त्यात एवढी चर्चा करण्याचे कारण काय?” आपल्या तोंडून सहज अशा प्रतिक्रिया निघतील. या प्रतिक्रिया देण्यापूर्वी दोन मिनिटे नक्की वेळ काढा आणि हा व्हिडिओ जरूर पाहा.
बांगलादेशमधल्या एका हेअर ऑईल कंपनीने हा व्हिडिओ बनवला आहे. फक्त एक जाहिरात नाही तर गंभीर संदेश यातून दिला आहे म्हणूनच हा व्हिडिओ बांगलादेशच नाही तर भारतातही व्हायरल होत आहे. घरगुती हिंसाचाराला सतत बळी पडलेली महिला ब्युटी पार्लरमध्ये जाते आणि आपले लांबसडक केस कापायला सांगते. ‘थोडे कमी’, ‘आणखी कमी’, ‘अजून कमी’ असे करत आपले लांबसडक केस कापून मानेपर्यंत तोकडे करते.
पण तरीही ती समाधानी होत नाही. हे केस आणखी कापून बारीक करायला सांगते. खरं तर इतरांसाठी यात नवल वाटण्यासारखं काहीच नसेल, पण जेव्हा ती लांबसडक केस कापण्याचे कारण सांगते तेव्हा मात्र सगळेच धक्का बसल्यासारखे तिच्याकडे पाहतात, कारण याच केसांना पकडून नवरा तिला मारत असतो. तिच्यावर अत्याचार करत असतो. आता पुन्हा त्याने असं करू नये म्हणून ती केस कापून टाकते. तसं पाहायला गेलं ही फक्त काही मिनिटांची जाहिरात पण तिच्यामागची सत्य काहाणी मात्र हादरवून सोडणारी. आजही १०० पैकी ८० महिला या घरगुती हिंसाचाराला बळी पडतात. तर बीबीसीच्या अहवालनुसार भारतात ५ पैकी १ महिला हिंसाचाराला बळी पडतात. या जाहिरातीतून घरगुती हिंसाचारावर आवाज उठवण्याचे आव्हान महिलांना करण्यात आले आहे.