Friend Birthday Celebration Video : आयुष्यात चांगले मित्र-मैत्रिणी फार गरजेच्या असतात. कारण त्या तुमची परिस्थिती, भावना समजून घेऊ शकतात. तुम्ही त्यांच्याकडे मनमोकळेपणाने बोलू शकता. शाळेपासून, कॉलेजपर्यंत आनंदाचे क्षण मैत्र-मैत्रिणींसह घालवता येतात. ग्रुपमधील एखाद्याचा वाढदिवस जल्लोषात साजरा करतात. मित्राच्या वाढदिवसाची पार्टी म्हणजे तर फुल्ल धम्माल, मज्जा असते. अशाचप्रकारे एका कॉलेजमधील तरुणींनी त्यांच्या जिवलग मैत्रिणीचा वाढदिवस साजरा करण्याचा प्लॅन केला. यावेळी त्यांनी अगदी कमी खर्चात तिच्यासाठी वर्गातच असं काही सेलिब्रेशन ठेवलं की ती आयुष्यभर विसरणार नाही. सध्या सोशल मीडियावर या सुंदर वाढदिवसाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना त्यांची कॉलेज लाईफ आठवली.

व्हिडीओत काही तरुणी आपल्या खास मैत्रिणीच्या वाढदिवसासाठी वर्गातच सजावट करताना दिसतायत. मैत्रिणीला हे सरप्राईज आवडावं यासाठी त्यांची विशेष तयारी सुरू आहे.

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, सहा-सात जणींचा एक ग्रुप आहे. या ग्रुपमधील एकीचा वाढदिवस असल्याने तिच्यासाठी उरलेल्या सहा जणी वर्गातच अगदी कमी खर्चात खास सेलिब्रेशन करतात. यासाठी त्या फळ्यावर भल्या मोठ्या केकचं स्केच ड्रॉ करतात. यानंतर तिला डोक्यावर घालण्यासाठी कापडापासून टिआरा तयार करतात. हॅप्पी बर्थ डेचा बँड म्हणून स्कार्फ ठेवतात आणि तिच्या एन्ट्रीवेळी उडवण्यासाठी कागदाचे बारीक तुकडे करून ठेवतात.

यावेळी जेव्हा वाढदिवस असलेली मैत्रीण वर्गात शिरते, तेव्हा सर्व मैत्रिणी टाळ्या वाजवून तिचे जल्लोषात स्वागत करतात आणि तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ लागतात. यानंतर हॅप्पी बर्थ डेचा बँड म्हणून तिच्या गळ्यात तो स्कार्फ घालतात, डोक्यावर कापडाचा टिआरा ठेवतात. यानंतर तिला फळ्यावरील मेणबत्ती पुसायला सांगतात आणि फळ्यावर ड्रॉ केलेला केक पुसून आणि सर्वांना असंच मुद्दाम केक भरवण्याची ॲक्टिंग करते. फळ्यावर ड्रॉ केलेला केक खरंच प्रत्यक्षात कापतेय असा अनुभव घेत त्या मैत्रिणी तिचा वाढदिवसाचा आनंद घेतात. मैत्रिणींनी अशा हटके पद्धतीने साजरा केलेल्या या वाढदिवसाचे क्षण त्या तरुणीला आयुष्यभर स्मरणात राहतील, त्यामुळे मैत्रीत पैसा नाही, तर मन मोठं पाहिजे याचे हे उत्तम उदाहरण आहे.

अगदी कमी बजेटमध्ये साजरा केलेल्या या वाढदिवसाचे क्षण पाहून अनेकांना त्यांनी कॉलेजमध्ये केलेल्या मज्जा, मस्तीचे क्षण आठवले. या व्हिडीओने सध्या अनेकांचे मन जिंकलेय, तर काहींनी व्हिडीओची खिल्ली उडवली आहे. एका युजरने लिहिले की, ‘वाह, खूप सुंदर, वाढदिवसाच्या शुभेच्छा डिअर’. दुसऱ्याने लिहिले की, ‘वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे हे अविस्मरणीय क्षण आहेत,’. तिसऱ्याने लिहिले की, ‘हा तुमच्या आयुष्यातील सर्वात बेस्ट बर्थडे सेलिब्रेशन आहे, यापेक्षा चांगले काहीही असू शकत नाही.’ त्याच वेळी काही युजर्सनी या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनची खिल्लीही उडवली आहे. एकाने लिहिले आहे की, ‘लो बजेट बर्थडे सेलिब्रेशन.’ तर अनेकांनी हार्ट इमोजी शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Story img Loader