Professional Baby Namer Girl: घरात नव्या बाळाची चाहूल लागली की लगेच एकदम हटके नाव शोधण्याची तयारी सुरु होते. पूर्वी लोकं एखाद्या देवाच्या- फुलाच्या, राजाच्या-आज्याच्या, अगदीच हटके म्हणजे हिरो हिरोईनच्या नावावरून आपल्या लेकरांचे नावे ठरवायची. पण अलीकडे ट्रेंड, सीझन, आई बाबांच्या नावाचा हॅशटॅग अगदी विज्ञान वापरून एक भलतंच नाव तयार केलं जातं. नाव ठरवण्याची पद्धत जरी बदलली असली तरी वर्षानुवर्षे नाव ठरवण्याचा मान हा बाबांच्या बहिणीकडे म्हणजेच बाळाच्या आत्याबाईंकडेच असतो. पण आता या आत्याबाईंचा मान घेऊन एका तरुणीने चक्क नवीन व्यवसाय सुरु केला आहे.
इंस्टाग्रामवर प्रचलित असणारी प्रोफेशनल बेबी नेमर म्हणजेच थोडक्यात लहान मुलांचे नाव सुचविण्याचे काम करणारी तरुणी सध्या चर्चेत आली आहे. Taylor A. Humphrey ही न्युयॉर्क मध्ये राहणारी तरुणी श्रीमंतांना त्यांच्या मुलांसाठी अर्थपूर्ण नावं सुचवते आणि त्यासाठी किमान १५०० डॉलर्स म्हणजे १ लाखांपेक्षाही जास्त रुपये घेते. काही श्रीमंतांनी तर तिच्या कामावर खुश होऊन १०,००० डॉलर्स म्हणजे ७ लाखांपेक्षाही अधिक मानधन दिले आहे.
बाळाचे नाव ठरवताना काय अभ्यास केला जातो?
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की नाव ठरवण्यात काय मोठं काम आहे? तर मंडळी ही तरूणी नावे सुचवण्याआधी त्या कुटुंबाची वंशावळ तपासून मगच त्यानुसार साजेशी नावे सुचवते. याशिवाय वर लिहिल्याप्रमाणे आई वडिलांच्या नावाचा हॅशटॅग, कुटुंबाचा व्यवसाय, आईवडिलांची कला क्षेत्रातील आवड या सगळ्याचा अभ्यास करून मगच काही नावे ती तयार करते. आईवडिलांना भेटून किंवा त्यांच्याशी संवाद साधून मग पुढे एका नावाचा पर्याय निवडला जातो.
आपण आजवर शेक्सपिअरचं नावात काय आहे हे वाक्य असंख्य वेळा ऐकलं असेल पण टेलरच्या मते एखाद्या बाळाचं नाव हे त्याच्या पूर्ण आयुष्याला आकार देत असतं. त्या नावाचा अर्थ बाळाला एक ऊर्जा देतो आणि म्हणूनच नाव ठरवताना खूप विचार करणे गरजेचे असते.
हे ही वाचा<< ..म्हणून ‘इथे’ तरुणी ‘ब्रा’ काढून प्रार्थना करतात; जगप्रसिद्ध Bra Fence चा हटके इतिहास जाणून घ्या
दरम्यान, २०१५ मध्ये टेलरने सोशल मीडिया अकाऊंटवर बाळांची नावे आणि त्याचा अर्थ शेअर करायला सुरूवात केली. या इंस्टाग्राम व्हिडीओजला मिळणाऱ्या प्रतिसादाला पाहता २०१८ मध्ये तिने आपले हे टॅलेंट व्यवसायात रूपांतरित केले. त्यामुळे आता ही टेलर एकाअर्थी जगातील सगळ्यात खर्चिक आत्या ठरली आहे.