Travel ideas for Diwali 2023 : दिवाळीबरोबर थंडीलाही सुरुवात झाली आहे. जर तुम्हाला हिवाळा आवडत असेल, तर नोव्हेंबर महिना प्रवासासाठी योग्य मानला जातो. नोव्हेंबरमध्ये दिवाळी हा सर्वांत मोठा सण असतो. जवळपास पाच दिवस विविध राज्यांत या सणानिमित्त उत्साह अन् चैतन्याचे वातावरण पाहायला मिळते. या सणानिमित्त शाळा, कॉलेज आणि काही ऑफिसेसना सुट्टी असल्याने अनेक फिरायला जायचा प्लॅन करीत आहेत. ते लक्षात घेऊनच आज आम्ही तुम्हाला अशा काही ठिकाणांबद्दल सांगणार आहोत की, जिथे तुम्ही नोव्हेंबर महिन्यातील दिवाळीची सुट्टी चांगल्या प्रकारे एन्जॉय करू शकाल. कुटुंब आणि मित्र-मैत्रिणींच्या ग्रुपबरोबर तुम्ही तिथे खूप धमाल करू शकता.
दिवाळीच्या सुटीसाठी बजेट डेस्टिनेशन्स
१) कच्छचे रण, गुजरात
कच्छच्या रणची पांढरी वाळू हिवाळ्यात खूपच जादुई दिसते. गुजरातचे अंतहीन मिठाचे वाळवंट हिवाळ्याच्या काळात त्याच्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. त्याशिवाय नोव्हेंबर महिन्यात दरवर्षी येथे रण उत्सवही साजरा केला जातो; जो पाहण्यासाठी परदेशांतूनही लोक येत असतात. या काळात येथील सौंदर्य खूप बहरून येते.
२) भरतपूर, राजस्थान
भरतपूर पक्षी अभयारण्य म्हणून ओळखले जाणारे केवलदेव राष्ट्रीय उद्यान हे पक्षीप्रेमींसाठी योग्य ठिकाण आहे. येथे पक्ष्यांच्या सुमारे ३७० प्रजाती पाहायला मिळतात आणि नोव्हेंबर जवळ येत असताना येथे अनेक स्थलांतरित पक्षी जसे की, पेलिकन, गीज, बाज, ब्ल्यू टेल्ड बी इर्टर व गार्गेनी येत असतात. अफगाणिस्तान, तुर्कमेनिस्तान, चीन व सायबेरिया येथूनही मोठ्या प्रमाणात आलेले पाणपक्षी हिवाळ्यात इथे पाहायला मिळतात.
३) गोवा
दरवर्षी गोव्यात आशियातील सर्वांत मोठा चित्रपट महोत्सव आयोजित केला जातो. या महोत्सवात जगभरातील प्रसिद्ध चित्रपट दाखविले जातात. तसेच विश्वातील प्रसिद्ध चित्रपट कलाकार, चित्रपट निर्माते, समीक्षक या महोत्सवाला भेट जातात. नोव्हेंबर महिन्यात गोव्याचे हवामानही चांगले असते. त्यामुळे गोव्याचे सुंदर दृश्य तुम्हाला पाहायचे असेल, तर नोव्हेंबर महिना बेस्ट आहे. कारण- पावसामुळे बंद असलेल्या गोव्यातील सर्व बाजारपेठा, तसेच हॉटेल्स, पब, रेस्टॉरंट्सही खुले होतात.
४) अमृतसर, पंजाब
अमृतसरमध्ये गुरुपर्व हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. यावेळी येथील प्रसिद्ध सुवर्णमंदिराला सुंदर सजावट करण्यात आली आहे. या काळात या शहराचे सौंदर्य शिखरावर असते. गुरुपर्वानिमित्त ठिकठिकाणी लंगरचे आयोजन केले जाते. त्यासोबतच कीर्तन आणि कथाही होतात.
५) शिलाँग, मेघालय
येथे दरवर्षी नोव्हेंबरमध्ये शिलाँग चेरी ब्लॉसम फेस्टिवल आयोजित केला जातो. या काळात अनेक मोठे कलाकार येथे सादरीकरणासाठी येतात. त्यामुळे या ठिकाणची संस्कृती, खाद्यपदार्थ, कला व संगीत याविषयी जाणून घेण्यात तुम्हालाही रस असेल, तर हा काळ अगदी परिपूर्ण आहे.