ब्रह्मा कुमारींनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात आज पंतप्रधान मोदींनी नागरिकांना संबोधित केले. यावेळी त्यांना वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य केले. नागरिकांना संबोधित करताना त्यांनी ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ ऐवजी ‘बेटी बचाव, बेटी पटाव,’ म्हटल्यानं त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. पंतप्रधान मोदींनी राष्ट्रीय स्तरावर लोकांना संबोधित करताना एका घोषणेचा चुकीच्या पद्धतीने उच्चार केल्याने त्यातून चुकीचा संदेश जातो, अशी टीका त्यांच्यावर होत आहे.

या कार्यक्रमात मोदी ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या घोषणेचा संदर्भ देत बोलत होते. मात्र, बोलताना ते पढाओ शब्द चुकीचा बोलले त्यामुळे घोषणेचा पूर्ण अर्थ बदलला आणि त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

झालं असं की मोदी ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या योजनेच्या यशाबद्दल सांगत होते. यावेळी बोलताना ते ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ ऐवजी ‘बेटी बचाव, बेटी पटाव,’ असं म्हणाले. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तर, व्हायरल व्हिडीओवरून नेटकरी त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल करत आहेत. ‘आज पुन्हा टेलीप्रॉम्टर बंद पडला का,’ असा प्रश्न विचारत त्यांची खिल्ली उडवण्यात येत आहे. मोदीजी बोलता बोलता त्यांच्या ‘मन की बात’ बोलून गेले, असं म्हणत एका युजरने त्यांना ट्रोल केलंय.

काँग्रेस नेते श्रीनिवास बीव्ही यांनी देखील मोदींचा हा व्हिडीओ ट्वीट करत त्यांच्यावर निशाणा साधलाय. ‘टेलीप्रॉम्टरवर वाचूनही हे काय बोलून गेले मोदीजी, थोडी तरी लाज ठेवा,’ असं कॅप्शन टाकत त्यांनी पोस्ट टाकली आहे.

दरम्यान, या कार्यक्रमात बोलताना मोदी यांनी इतिहासातील काही उदाहरणे दिली. “राणी चेन्नम्मा, मातंगिनी हाजरा, राणी लक्ष्मीबाई, कित्तूरच्या वीरांगना झलकारीबाईपासून ते अहल्याबाई होळकर आणि सावित्रीबाई फुले यांनी सामाजिक क्षेत्रात भारताची अस्मिता जपली. अनेक कठीण प्रसंगांनी भरलेल्या मध्ययुगीन काळातही या देशात पन्नाध्याय, मीराबाईसारख्या थोर स्त्रिया होत्या. आणि अमृत महोत्सवात देशाच्या ज्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासाची आपण आठवण करतोय, त्यातही अनेक महिलांनी बलिदान दिले आहे. जेव्हा जग गडद अंधारात होते, स्त्रियांबद्दलच्या जुन्या विचारसरणीत अडकले होते, तेव्हा भारत माता शक्तीची देवीच्या रूपात पूजा करत असे. आमच्याकडे गार्गी, मैत्रेयी, अनुसूया, अरुंधती आणि मदालसा यांसारख्या विद्वान स्त्रियांनी समाजाला ज्ञान दिले,” असं मोदी या कार्यक्रमात बोलताना म्हणाले.

Story img Loader