आजकाल फसवणुकीच्या घटनेत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. कोणतीही वस्तू खरेदी करताना ग्राहकांनी थोडी सावधगिरी बाळगणे फार गरजेचे असते. खासकरून इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करताना काळजी घ्या. प्रवास करताना अनेकदा प्रवाशांबरोबर फसवणुकीच्या घटना घडतात. बस असो की रेल्वे प्रवास, काही विक्रेते येऊन प्रवाशांची फसवणूक करून निघून जातात, तरीही आपल्याला कळत नाही. रेल्वेमध्ये अनेक विक्रेते विविध प्रकारच्या वस्तू विकण्यासाठी येतात आणि आपण वस्तू स्वस्त दरात मिळत असल्याने काही विचारही न करता वस्तू विकत घेतो आणि फसवणुकीला बळी पडतो. आता अशाच एका ट्रेनमधील व्हिडीओ व्हायरल होत आहे. एक विक्रेता रेल्वेमध्ये मोबाइलची पॉवर बँक विकत होता. पण, जेव्हा ही पॉवर बँक तपासून पाहिली असता तेव्हा त्यामध्ये काहीतरी वेगळचं सापडलं. पाहा या विक्रेत्याची भांडाफोड कशी झाली…

ट्रेनने प्रवास हा नेहमीच संस्मरणीय असतो. जेव्हा ट्रेन वेगवेगळ्या मार्गांवरून जाते तेव्हा अशी दृश्ये दिसतात, जी माणसाच्या मनात घर करून राहतात. विमान प्रवासापेक्षा ट्रेनच्या प्रवासात थोडा जास्त वेळ लागतो, पण आजही ट्रेन ही अनेकांची पहिली पसंती आहे. या काळात अनेक आठवणी तयार होतात, ज्या लोकांना आयुष्यभर लक्षात राहतात. यातील काही लोकांना त्यांच्यासोबत झालेली फसवणूकही आठवते. या प्रवासात काही लोकांची फसवणूकही होते. आता त्यांच्यासोबत असे घडते, कारण ते रेल्वेत इलेक्ट्रॉनिक वस्तू विकण्यासाठी आलेल्या लोकांकडून वस्तू खरेदी करतात आणि ते नीट तपासत नाहीत. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये हे लोक प्रवाशांना कसे फसवतात हे या व्हिडीओतून कळते.

व्हायरल व्हिडीओमध्ये काय दिसले?

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती पॉवर बँक विकताना दिसत आहे. एक प्रवासी पॉवर बँक घेण्याची इच्छा व्यक्त करतो आणि विक्रेत्याला पॉवर बँक दाखव म्हणतो. विक्रेता ग्राहकाला पॉवर बँक विकण्यासाठी प्रवाशाचा मोबाइल चार्ज होत असल्याचेही दाखवतो. तेव्हा प्रवासी त्याला पॉवर बँकची किंमत विचारतो. विक्रेता किंमत जास्त सांगत असल्याने प्रवासी त्याला पैसे कमी करायला सांगतो. विक्रेता त्याला लगेच किंमत कमी करून देतो. ग्राहक पॉवर बँक नीट तपासण्याचा प्रयत्न करतो, परंतु विक्रेता त्याला तपासू देत नसल्याने प्रवाशाचा विक्रेत्यावरील संशय वाढला अन् त्यांनी या पॉवर बँक नीट उघडून पाहिल्या आणि त्यानंतरच पॉवर बँकमागील खरे सत्य बाहेर आले.

(हे ही वाचा : पेट्रोल पंपावर कर्मचारी गाडीत इंधन भरत असताना मागेहून स्कूटीने आलेल्या तरुणीनं केलं असं की..; Video व्हायरल )

पॉवर बँकेच्या आत एक लहानशी बॅटरी होती आणि तिचे वजन वाढवण्यासाठी उर्वरित भागात माती होती. सत्य उघडकीस आल्यानंतर तो प्रवाशाला धमकावत ‘व्हिडीओ का बनवतोय, व्हिडीओ बंद कर’ असे म्हणतो. मग त्यानंतर सर्व प्रवाशांनी मिळून या फ्रॉड विक्रेत्याची धरपकड केली आणि पोलिसांकडे सोपवण्याचा इशारा दिला. ट्रेनमधील या फसवणुकीचे अनेक जण बळी ठरले असतील. पण, त्या मुलाने अतिशय हुशारीने विक्रेत्याकडून बनावट पॉवर बँक हिसकावून घेतली आणि त्याचा व्हिडीओ शूट करून सोशल मीडियावर अपलोड केला.

येथे पाहा व्हिडिओ

हा व्हिडीओ मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) वर @Iamsankot नावाच्या खात्यासह शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ शेअर करताना ‘पॉवर बँकेत चिखल निघाला आहे, सावध रहा, सतर्क रहा’ असे कॅप्शन लिहिले आहे. वृत्त लिहिपर्यंत ३० हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी अशा बनावटी वस्तू विकणाऱ्या विक्रेत्यांवर कठोर कारवाई करा, अशी मागणी करत आहेत.