Bigg Boss Suraj Chavan: बिग बॉस मराठी सीझन पाच जिंकल्यानंतर राज्यभरातून सूरज चव्हाण याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सूरज चव्हाण विजेता झाल्याने संपूर्ण महाराष्ट्राला आनंद झालाय. आपले प्रयत्न प्रामाणिक असले, आपल्यामध्ये काहीतरी चांगलं करुन दाखवण्याची जिद्द राहिली तर आपल्याला यश हे नक्की मिळतं. कदाचित ते यश आपली परीक्षा घेत असेल, बऱ्याचदा हुलकावणी देत असेल, किंवा बऱ्याचदा संघर्षामुळे आपलं इतकं मानसिक खच्चिकरण होत असेल की आता नको आणि परत मागच्या वाटेला जाऊयात असं वाटत असेल, पण आपण पुन्हा जिद्दीने परिस्थितीला सामोरं गेलो, आपण परिस्थितीशी झगडत राहिलो तर ते यश अखेर आपल्या पायात अक्षरश: लोटांगण घालतं. हेच सुरज चव्हाणने सिद्ध करुन दाखवलं आहे.

सुरुवातीला बिग बॉसच्या घरात यायला नकार देणारा सूरज आज बिग बॉसची ट्रॉफी घेऊन आला आहे. सूरज चव्हाण बिग बॉसच्या घरात गेला तेव्हा एक रिल्सस्टार म्हणून प्रसिद्ध होता. पण सूरजचा खेळ, सूरजचा प्रामाणिकपणा, सूरजचा वैयक्तिक आयुष्यातील संघर्ष यामुळे तो चाहत्यांचा जास्त प्रिय होत गेला. त्याचा चाहत्यांचा प्रचंड पाठिंबा शेवटपर्यंत मिळत गेला. अखेर सूरजच्या चाहत्यांनी त्याला शेवटपर्यंत साथ देत विजयी केलं आहे. दरम्यान एवढ्या मोठ्या घरातही सुरजला मात्र वारंवार गावची आठवण येत होती. मातीशी एकनिष्ठ असणाऱ्या व्यक्तीला कितीही उंच घेऊन जा मात्र त्याची नाळ कायम मातीशीच जोडलेली असते.

अशातच आता सुरज लवकरच आपल्या गावी म्हणजेच बारामती तालुक्यातील मोडवे या गावात येणार आहे.सुरज चव्हाण बारामती तालुक्यातील मोडवे या गावातला रहिवासी आहे. त्याच्या विजयानंतर मोडवे गावामध्ये त्याच्या चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा केला आहे. गावकऱ्यानी फटाके फोडून आणि् गुलालाची उधळण करीत आनंद साजरा आहे. त्यासोबतच बिग बॉस विजेता गावामध्ये परत आल्यावर गावकऱ्याकडून त्याच्या मिरवणुकीची भव्य तयारी करण्यात आली आहे. सुरजच्या स्वागतासाठी त्याच्या चाहत्यांनी चक्क २०० किलोचा हार आणला आहे. एवढंच नाहीतर १२ डीजे त्याच्या स्वागताचा जल्लोष करण्यासाठी सज्ज आहेत. आता फक्त गावात सूरजच्या आगमनाची प्रतिक्षा सगळ्यांना लागली आहे. सुरजच्या गावच्या घराबाहेरील एक व्हिडीओ समोर आला असून तो आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: पुणेकरांचा अंदाज खरा ठरला! ‘सुरज’चा गुलीगत विजय; मात्र ‘या’ कारची सोशल मीडियावर का होतेय तुफान चर्चा?

सोशल मीडियावर nng_maharashtra_bailgadasharyt नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडीओ सोशल करण्यात आला आहे.