कदाचित भारतातील सर्वात मोठ्या अपार्टमेंट विक्रीमध्ये, वरळीतील आगामी हाय-एंड निवासी प्रकल्पातील २३ लक्झरी फ्लॅटचा समावेश असणार आहे. कारण या २३ फ्लॅटचा सौदा सुमारे १,२०० कोटी रुपयांमध्ये झाला आहे. त्यामुळे इतक्या महाग विकले गेलेले हे पहिलेच फ्लॅट असल्याचं बोललं जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, DMart चे संस्थापक राधाकृ्ष्ण दमानी यांचे कुटुंब, नातेवाईक, मित्र आणि जवळच्या सहकाऱ्यांनी डॉ. एनी बेझंट रोडवरील थ्री सिक्स्टी वेस्टच्या टॉवर बी मध्ये हे आलिशान फ्लॅट्स खरेदी केले आहेत. अपार्टमेंट विक्रेता बिल्डर सुधाकर शेट्टी आहे, ज्याने या प्रकल्पातील अपार्टमेंटचा शेवटचा हिस्सा विकला. शेट्टी यांनी बिल्डर विकास ओबेरॉय यांच्यासोबत या अपार्टमेंटची भागीदारी केली होती.
हेही पाहा –मुलीने चक्क केकपासून बनवला ड्रेस; गिनीज बुकमध्ये नोंद झालेल्या केक ड्रेसचा Video एकदा पाहाच
सर्वाधिक किमतीला विकले गेलेल्या फ्लॅटचा आकार सुमारे ५,००० चौरस फूट असून यातील प्रत्येक फ्लॅटला सुमारे ५०-६० कोटी रुपये मिळाले आहेत. २३ फ्लॅटच्या विक्रीतून मिळालेली संपूर्ण रक्कम शेट्टी यांनी पिरामल फायनान्सकडून घेतलेल्या सुमारे १ हजार कोटी रुपयांच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी वापरणार असल्याचंही सांगितलं जात आहे.
महत्वाची बाब इतक्या महागात विकले गेलेल्या या फ्लॅट्सची विक्री डिस्काऊंटसह झाल्याचंही या क्षेत्रातले जाणकार सांगत आहेत. या फ्लॅट्सच्या खरेदीबाबत मागील पाच महिन्यापासून वाटाघाटी सुरु होत्या. अखेर शुक्रवारी व्यवहार पुर्ण झाला. त्यानुसार हे फ्लॅट्स डीमार्टचे संस्थापक राधाकृष्ण दमानी यांनी त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार आणि निकटवर्तीयांसाठी २३ फ्लॅट्स खरेदी केले. ज्या फ्लॅट्सची किंमत जवळपास १२०० कोटी इतकी आहे.
हेही वाचा- अनंत अंबानीने साखरपुड्यात घातलेला ‘कार्टियर पँथर ब्रोच’ कोणी दिला? ‘त्या’ व्यक्तीचं नाव आलं समोर
थ्री सिक्स्टी वेस्टमधील काही मोठ्या अपार्टमेंट्सची यापूर्वीही ७५ ते ८० कोटी रुपयांना विक्री झाली आहे. मागील वर्षी IGE (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेडने १५१ कोटींना या प्रकल्पातील दोन अपार्टमेंट्स खरेदी केल्याचीही माहिती मिळत आहे. तर राधाकृष्ण दमानी आणि त्यांचे भाऊ यांनी दक्षिण मुंबईतील नारायण दाभोलकर रस्ता येथे १,००१ कोटी रुपयांना एक मधु कुंज नावाचा बंगला खरेदी केला होता. हा बंगला मलबार हिलमध्ये सुमारे ६० हजार चौरस फूटांचा असून तो दीड एकर जमिनीवर पसरला आहे. तर २०२१-२२ च्या आसपास अलिबाग जवळच्या एका गावात सहा एकरांचे बीचफ्रंट घर ८० कोटींना विकत घेतल्याचीही माहिती मिळत आहे.